Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeसंपादकीय‘स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत गांधींची अहिंसा शुरांची कशी’ यावर भाष्य करणारे मॅराथॉन अग्रलेख भाग...

‘स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत गांधींची अहिंसा शुरांची कशी’ यावर भाष्य करणारे मॅराथॉन अग्रलेख भाग २ रक्त न सांडता भारताला स्वातंत्र्य मिळालं का?

गणेश सावंत
मो. नं. ९४२२७४२८१०
चले जाओ, करेंगे या मरेंगे या साध्या सुध्या शब्दांना वेदमंत्राहूनही अधिक महत्त्व प्राप्त झालं ते महात्मा गांधी यांच्या शुराच्या अहिंसेमुळेच. काल आणि आज महात्मा गांधींची टिंगलटवाळी करणारे महात्मा गांधींच्या अहिंसेमुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले का? रक्त न सांडता स्वतंंत्र्याचा संग्राम झाला का? स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवणार्‍या हुतात्म्यांचं काय? ‘या म्हतार्‍याने तर देशाची फाळणी केली, हा म्हातारा मुसलमानांच्या बाजूने होता’ असे एक ना अनेक आरोप आणि टवाळी गांधींबाबत सातत्याने करण्यात आली आणि आजही करण्यात येत आहे. रक्त न सांडता भारताला स्वातंत्र्य मिळालं का? याचं उत्तर आज आपण देवूच. गांधींची अहिंसा काय होती? गांधींची देशभक्ती काय होती? गांधी सत्तेसाठी इंग्रजांशी लढत होते का? त्यांना भारताचे सर्वोच्च पद घ्यायचे होते का? या सर्व प्रश्‍नांचे उत्तर गांधींना
नंगा फकीर’
या उत्तरातून नक्कीच देता येईल. हा शब्दप्रयोग आमचा नाही, महात्मा गांधी जेंव्हा इंग्लंडच्या महाराणीला भेटायला गेले तेंव्हा ते साध्या नेहमीच्या वेशभुषेत होते. अंगावर नुसता पंचा होता, तेंव्हा तेथील पंतप्रधान या नंग्या फकिराला राणीच्या महालात प्रवेश कोणी दिला? असं म्हणत गांधींकडे तुच्छतेने पाहिले होते. महाराणीची भेट झाल्यानंतर महात्मा गांधी जेंव्हा बाहेर आले तेंव्हा पत्रकारांनी त्यांनी हाच प्रश्‍न विचारला. तुम्ही महाराणीला भेटायला गेलात आणि तेही अंगावर एवढुशा कपड्यात? या प्रश्‍नावर गांधींनी अत्यंत मार्मिक उत्तर दिलं. गांधी म्हणाले, माझे आणि राणीचे कपडे जरा जास्तच होते. त्यांच्या या उत्तराने तेथिल पंतप्रधानांचा तिळपापड झाला आणि ते तेथून निघून गेले. सांगायचे तात्पर्य गांधींना सत्ता नको होती, पद, पैसा आणि प्रसिद्धीचाही हव्यास नव्हता. गांधींना हवे होते ते शांततेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य, गांधींना हवे होते या देशात एकता, गांधींना हवी होती या देशात समानता, गांधींना हवा होता प्रत्येकाच्या उरात स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची धगधगती ज्वाला. गांधींना सत्ता हवीच असती तर भारत स्वातंत्र्य झाल्यांनतर सर्व
नेत्यांना गुडाळून
अखंड हिंदुस्तानचे पदसिद्ध नेतृत्व त्यांनी केले असते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नवीन मंत्री मंडळ बनवले. सरदार वल्लभभाई पटेल देशाचा उपपंतप्रधान झाले. ते पोलादी पुरूष म्हणून जगविख्यात आहेत. त्यांनी स्वातंत्र्यानंतर ६५० संस्थानचे विलीनीकरण केले. मराठवाडा आणि हैद्राबादचा निजाम हा भारतात विलीन होत नव्हता तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाला अक्षरश: पायाशी आणून ठेवले. देशाची फाळणी झाली, सत्तेचे वाटप सुरू झाले, खर तर तेंव्हाच महात्मा गांधींनी सर्व कॉंग्रेसींना गुंडाळून स्वत: सत्ता काबीज करू शकले असते. विशेष म्हणजे सत्तेच्या वाटपात सर्वात अग्रस्थानी हे महात्माजींचे होते. परंतू तरीही ते राजकारणातून अंग काढतांना दिसून आले. म्हणूनच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणतात, जयाच्या क्षणी कुठे होता तो, महात्माजी सत्तेसाठी नव्हते सेवेसाठी होते. स्वातंत्र्याचे ध्येय साकार होताच ते दंगली होवू नयेत म्हणून कलकत्त्यात गेले. महात्माजी स्वातंत्र्य मिळण्या अगोदरच म्हणाले होते, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माझे काम दिल्लीत नाही जनतेत आहे. त्यामुळे जनतेत जातीय दंगली उसळल्यानंतर लोकांत जावून जातीयतेचे विष बाजुला काढत राहिले. उभ्या आयुष्यात त्यांनी पोलीस संरक्षण घेतले नाही. एकदा मुंबईत हिंदु-मुस्लिम दंगल झाली. तेंव्हाचे एस.एम.जोशी हे रस्त्यावर उतरले, संतप्त जमावातून एका मुस्लिमाचा त्यांनी जीव वाचवला. याला बरीच प्रसिद्धी मिळाली. त्याचवेळी मोरारजी हे मोठा पोलीस बंदोबस्त घेवून दंगलीच्या ठिकाणी जात होते. बैठका घेण्याचे सांगत होते. मोरारजी एकदा दंगलग्रस्त भागांचा दौरा करून परतले. गांधीजींना भेटले, तेंव्हा गांधीजी मोरारजींना म्हणाले, तु स्वत: दंगलीच्या ठिकाणी का गेला नाहीस? मोरारजी म्हणाले, सर्वत्र आक्रोश आहे. दंगलग्रस्त भागात गेलो असतो तर मला ठार मारले असते. त्यावर महात्मा म्हणाले, तू दंगल थांबायला गेला असतास आणि त्या प्रक्षोभात ठार झाला असतास तर मला तुझा अभिमान वाटला असता. यावरूनच गांधींची भूमिका स्पष्ट होते. गांधी स्वत:साठी नव्हते तर देशासाठी होते. मात्र आजही तथाकथीत आणि धर्मांध गांधींच्या पुतळ्याला गोळ्या घालतात तेंव्हा खरच आम्ही म्हणण्यापेक्षा ते तथाकथीत आणि धर्मांध दळभद्रीच. महात्मा गांधींच्या
अहिंसेने काय साध्य केले?
या प्रश्‍नाचं त्रोटक उत्तर कालच्या अंकात दिलेच आहे. परंतू तरीही महात्मजींच्या अहिंसेने प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये स्वातंत्र्य संग्रामात निधड्या छातीने उभे राहण्याचे धाडस दिले. एकीकडे कधीही सत्तेचा सुर्य मावळणार नाही असे पांडरतोंडे सत्ताधिश या देशावर अजगरागत बसले होते. भारत मातेच्या हाता,पायांमध्ये पारतंत्र्याचे साखळदंड बांधून ठेवले होते. अन्याय होताच, अत्याचार होताच काही लालची गद्दारांच्या मदतीने गरीबाला गरीब, श्रीमंताला श्रीमंत ठेवले जात होते. छुत अछुत याला अधिक महत्त्व दिलं जात होतं. फोडा आणि तोडाची निती गावागावात राबवली जात होती. त्यामुळे देशप्रेम असतांना, राष्ट्रनिष्ठा असतांना केवळ मरणाच्या भितीपोटी या देशाचा नागरिक गुलाम म्हणून राहणे पसंत करत होता. कोणाकडे शस्त्र नव्हती, कोणाकडे भितीमुळे इच्छा शक्ती राहिली नव्हती, इंग्रजांविरोधात आंदोलन करावे तर नेमके काय कराव? त्यांना विरोध करावा तर तो कसा करावा? हे लक्षात येत नव्हते. तेंव्हा गांधींची अहिंसा कामी आली. सत्याग्रह कामी आला, शस्त्र न उलचता, अस्त्र न उचलता गांधींच्या सत्याग्रहाने इंग्रजांना जेरीस आणले. अवघा देश गांधींच्या अहिंसावादी सत्याग्रहात सामील होत गेला. हजारो वर्ष चुलीजवळ असलेल्या महिला या अहिंसेमुळे आणि सत्याग्राहाच्या योजनेमुळे रस्त्यावर आल्या. सरकार विरोधात आपली भूमिका स्पष्ट करू लागल्या. हातामध्ये भारताचा ध्वज घेत स्वाभिमानाने भारत माता की जय, वंदे मातरम् म्हणू लागल्या. या घोषणांनी इंग्रज सरकार आतमधून घाबरले या अहिंसेने साध्य केले. मग
गांधींच्या अहिंसेमुळे स्वातंत्र्य
मिळालं की क्रांतीमुळे?
हा वादाचा आणि शोधाचा विषय नक्कीच नाही. उगाच गांधीवाद्यांना, अहिंसावाद्यांना किंवा क्रांतीकार्‍यांना कुठल्या तरी एका बंधनात अडकवून ठेवण्याचा हा उपद्व्याप म्हणावा लागेल. काही जण म्हणतात की रक्ताचा एक थेंब न सांडता महत्माजींनी स्वातंत्र्य मिळवले काय? याचं उत्तर नवाकाळचे तत्कालीन संपादक स्व.निळकंठ खांडीलकर बाबा देतांना म्हणतात. रक्ताचा एकही थेंब न सांडता भारताला स्वातंत्र्य मिळालं नाही. स्वातंत्र्य ही अशी स्वस्तात मिळणार चीज नाही. ज्या क्रांतीकार्‍यांनी दोन-चारशे ब्रिटीश जुलमी अधिकार्‍यांना ठार केले आणि स्वत: हसत-हसत फाशी गेले त्यांनी स्वातंत्र्य मिळाले काय? त्याचेही उत्तर नाही हेच. ज्या साम्राज्यावर सुर्य कधी मावळत नव्हता त्या ब्रिटीशांच्या साम्राज्यातून सुटका होणे ही सर्वात कठीण बाब आहे. काही इंग्रज अधिकारी ठार मारून इंग्रज जातील ही गोष्ट अशक्य होती. उलट त्यामुळे ब्रिटीशांना जुलूम करण्यास निमित्त मिळाले मात्र क्रांतीकारक शहिद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू हे इनक्लाब जिंदाबादच्या घोषणा देत २३ मार्च १९३१ रोजी फासावर गेले. अशा क्रांतीकारांच्या त्यागामुळे स्वातंत्र्यासाठी उर्मी उसळल्या पण शहिद व्हायला कोण तयार होते? मग भारताला स्वातंत्र्य कोणी मिळून दिलं याचं उत्तर ज्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. सरसेनापती होवून जयहिंदचा नारा दिला. चलो दिल्ली अशा रोमहर्षक घोषणा देत भारतीय सैनिकात स्वातंत्र्याची आकांक्षा पेटवली. तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा म्हणत स्वतंत्र्य सेना तयार केली ते नेताजी सुभाषचंद्र बोस. स्वातंत्र्याच्या या संग्रमात आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी सर्व प्रथम सुभाषचंद्र बोस यांचे नाव आपल्याला घ्यावे लागेल. भारतातील आपली सत्ता हिंदसेनेच्या व पोलीसदलाच्या निष्ठेवर अवलंबून होती पण नेताजी यांच्या आझाद हिंद सेनेमुळे आज हिंद सैन्यात स्वातंत्र्याची आकांक्षा जागृत झाली आहे असे दस्तुरखुद्द तेंव्हाचे पंतप्रधान लॉर्ड ऍटली यांनी भारत स्वाधीन करतांना म्हटले होते. यावरून स्वातंत्र्य कोणामुळे मिळाले? या इतिहासाचे उत्तर सर्व प्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यानंतर महात्मा गांधी, त्यानंतर क्रांतीकारक हुतात्मे आणि त्या पाटोपाट अनामिक असंख्य लोकांचा त्याग. क्रमश:

उद्याच्या अंकात ‘गांधींचे तुकाराम’

Most Popular

error: Content is protected !!