Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडअर्जुनराव जाहेर पाटील यांचे निधन सहकार, उद्योग, शिक्षण क्षेत्रातला आधारवड कोसळला

अर्जुनराव जाहेर पाटील यांचे निधन सहकार, उद्योग, शिक्षण क्षेत्रातला आधारवड कोसळला


बीड (रिपोर्टर)- सहकार, शिक्षण, उद्योग क्षेत्रात आपला ठसा निर्माण करणारे छत्रपती शाहू महाराज बँकेचे सर्वेसर्वा अर्जुनराव जाहेर पाटील यांचे मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मृत्यूसमयी त्यांचे वय ७६ वर्षे होते. आज त्यांच्या पार्थीवावर नामलगाव नजीक त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. जाहेर आप्पा म्हणून ते सर्वत्र परिचीत होते. गेल्या पाच ते सहा दशक भरात त्यांनी मराठा समाजासह बहुजन समाजातील तरुणांना उद्योग क्षेत्रासह सहकार क्षेत्रात यशस्वी करण्यासाठी वेळोवेळी प्रेरणा दिली होती. आज शाहू बँकेचा हा आधारवड कोसळला.
गेल्या पाच ते सहा दशकांपासून मराठा समाजासह बहुजन समाजातील तरुणांनी उद्योग धंद्यासह सहकार आणि शिक्षण क्षेत्रात काम करावे यासाठी प्रयत्न करणारे अर्जुनराव जाहेर पाटील हे मूळचे ईटकूर या गावचे रहिवासी सुरुवातीपासून ते बीडमध्येच रहात असायचे. सकल मराठाच्या माध्यमातून सामुहिक विवाह सोहळे व प्रबोधनात्मक कार्यक्रम ते सातत्याने घेत असायचे. सहकार क्षेत्र, उद्योग क्षेत्रात त्यांनी प्रचंड नाव कमावलं असून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाते ते सदस्य आहेत. राजर्षि शाहू आयटीआयचे ते संस्थापक अध्यक्ष असून राजर्षि छत्रपती शाहू महाराज बँकेचे ते सर्वेसर्वा आहेत. बँकेच्या माध्यमातून राज्यभर अनेक शाखा आहेत. राज्यस्तरीय अर्बन बँकेच्या फेडरेशनचे ते अध्यक्ष असून त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास जाहेर आप्पांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी दहा वाजता नामलगाव येथील त्यांच्या शेतात त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी डॉक्टर, वकील, पत्रकार, व्यापारी, बँक कर्मचारी, अधिकारी, शिक्षक तसेच वेगवेगळ्या पक्ष संघटनांचे पदाधिकारी यासह सर्वसामान्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकार क्षेत्राची मोठी हानी -ना.धनंजय मुंडे


छत्रपती शाहू बँकेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या निधनाने बीड जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. छत्रपती शाहू बँकेचे जाळे राज्यभर पसरवून सहकार, शिक्षण क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती, असे म्हणत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जाहेर अप्पा यांना ट्विटद्वारे श्रद्धांजली अर्पण केली.

उद्योग, शिक्षण क्षेत्राचा आधारवड कोसळला -आ.संदीप क्षीरसागर
गेल्या काही दशकांपासून उद्योग, शिक्षण, सहकार क्षेत्रात येण्यासाठी तरुणांना प्राधान्य देणारे सामाजिक उपक्रमासह तरुण वर्गाला कर्तव्य कर्म शिकवणारे उद्योग, शिक्षण, सहकार क्षेत्रात आधारवड असलेले अर्जुनराव जाहेर पाटील आज निघून गेल्याने या क्षेत्रातला आधारवड कोसळला असे म्हणत आ. संदीप क्षीरसागरांनी श्रध्दांजली अर्पण केली.

सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील उमदे व्यक्तिमत्त्व हरपले
छत्रपती राजर्षि शाहू अर्बन बँकेचे अध्यक्ष अर्जूनराव जाहेर पाटील यांच्या निधनाने बीड जिल्हयाच्या सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील उमदे व्यक्तिमत्त्व हरपले आहे अशा शब्दात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाने बीड जिल्हा एका उमद्या व्यक्तीमत्वाला मुकला आहे, त्यांच्या निधनाने कोसळलेल्या दुःखात मी व माझा परिवार सहभागी आहे, अशा शोकभावना व्यक्त करून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

Most Popular

error: Content is protected !!