गॅरेजलाईन गाड्या मोफत दुरुस्त करणार तर नेकनूरचा पेट्रोलपंप डिजेल 1 रुपयाने स्वस्त देणार
बीड (रिपोर्टर)- सराटे अंतरवलीत होत असलेल्या जाहीर सभेसाठी राज्यभरातून मराठा समाज उपस्थित राहणार आहे. त्या अनुषंगाने जो तो आपआपल्या परीने समाजासाठी खारीचा वाटा उचलताना दिसून येत असून बीड येथील गॅरेज लाईनने चौसाळा ते शहागडपर्यंत ज्या काही मराठा आंदोलकांच्या गाड्यांमध्ये बिघाड होईल तो मोफत दुरुस्त करण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर या दरम्यान मेकॅनिकल पेट्रोलिंगचाही ठेवण्यात येणार आहे तर दुसरीकडे नेकनूर येथील पेट्रोलपंप चालकांनी 14 तारखेला आंदोलकांच्या गाड्यांसाठी डिझेलचा दर एक रुपयाने कमी केला आहे.
याबाबत अधिक असे की, 14 ऑक्टोबर रोजी सराटे अंतरवली येथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होत आहे. बीड पोलीस प्रशासनाच्या अंदाजानुसार 30 ते 35 हजार वाहने या सभेसाठी जाणार आहेत. सभा न भूतो न भविष्यती अशी होत असल्याने जो तो या सभेसाठी आपला खारीचा वाटा उचलत आहे. बीड येथील गॅरेज लाईनने 14 तारखेला आंदोलना दरम्यान जाणार्या आंदोलकांच्या गाड्यांचा बिघाड झाला तर तो मोफत दुरुस्त करणार आहेत. त्यासाठी चौसाळा ते बीड अशी मेकॅनिकांची पेट्रोलिंगही राहणार आहे. ज्या ठिकाणी बिघाड होईल त्याठिकाणी जावून त्या गाड्या दुरुस्त केल्या जाणार आहेत. तसेच नेकनूर येथील सुरवसे पेट्रोलियम सर्व्हीसेस या पेट्रोल पंपाचे मालक ऋषीकेश सुरवसे यांनी 14 तारखेला एक रुपयाने डिझेल स्वस्त केले आहे.