केजमध्ये ऑटो गॅरेजला आग
सव्वा पाच लाखाची रक्कम जळून खाक
दुचाकी, तीन चाकी वाहनांच्या साहित्याचे नुकसान
केज (रिपोर्टर): केज शहरात एका ऑटो गॅरेजला अचानक लागलेल्या आगीत प्लॉट विक्रीची 5 लाख 20 हजार रुपयांची रोकड आणि दुचाकी, तीन चाकी वाहनांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. या दुर्घटनेत 11 लाख रुपयांचे नुकसान झाल्याने गॅरेज मालकावर आर्थिक संकट कोसळले आहे.
शहरातील आहिल्यादेवी होळकर नगर भागातील शंकर महादेव गाढवे यांचे बीड रस्त्यावर शासकीय विश्रामगृहाच्या समोर प्रीतम ऑटो गॅरेज आहे. कोरोनाच्या काळात त्यांच्या व्यवसायात खंड पडल्याने गॅरेजसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर फेडता आले नाहीत.
अगोदरच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शंकर गाढवे यांना कर्ज परतफेड करण्यासाठी बँकेने तगादा लावल्याने त्यांनी प्लॉट विक्री करून 5 लाख 20 हजार रुपयांची रक्कम बुधवारी रात्री उशिरा पर्यंत गोळा केली. गुरुवारी ती रक्कम बँकेत भरणार होते. ही रक्कम दुकानाच्या गल्ल्यात ठेवून ते घरी निघून गेले. गुरुवारी पहाटे अचानक दुकानात आग लागली. जवळ कोणी नसल्याने ही आग संपूर्ण दुकानात पसरली. धुराचे लोळ बाहेर पडल्याने अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाचे अबू खुरेशी, भास्कर ससाणे, दळवी यांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र आगीत दुकानातील गल्ल्यात ठेवलेली 5 लाख 20 हजार रुपयांची रक्कम, 6 लाख रुपये किंमतीचे तीन चाकी, दुचाकी वाहनांचे विविध प्रकारचे साहित्य व इतर वस्तू जळून खाक झाल्या. आगीचे कारण स्पष्ट झाले नसून गॅरेज मालक शंकर गाढवे यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
आर्थिक मदत करावी
कोरोना संकटातून सावरत असलेले शंकर गाढवे यांचे आगीत दुकान जळाल्याने 11 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रक्कम जळून गेल्याने बँकेचे कर्ज डोक्यावर राहिल्याने दुकान ही नष्ट झाल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. त्यांना सावरण्यासाठी व्यापारी वर्ग, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी आर्थिक मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे.