माजलगावात आ. सोळंकेंचा बंगला जाळला, आष्टीत तहसीलदारांची गाडी जाळली, अधिकार्यांना कार्यालयात कोंडले, गेवराईत महामार्गावर रास्ता रोको, वाहतूक पुर्णत: ठप्प, वडवणी तालुक्यात बंदची हाक, गावागावात सरकारच्या अंत्ययात्रा
बीड/आष्टी/माजलगाव/गेवराई (रिपोर्टर): मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आज अचानक हिंसक वळण घेतले. माजलगावमध्ये विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर आंदोलकांनी हल्लाबोल करत प्रचंड दगडफेक केली. त्याच दरम्यान सुरक्षा रक्षकाने एका आंदोलकाला मारहाण केल्यानंतर आंदोलक अधिकच संतप्त झाले आणि त्यांनी थेट सोळंकेंच्या बंगल्याला आग लावली. या आगीत चार ते पाच गाड्या जळून खाक झाल्या. इकडे आष्टीमध्ये तहसीलदारांची गाडी जाळण्यात आली तर आष्टीतील सर्व शासकीय कार्यालयांना संतप्त आंदोलनकर्त्यांनी कुलूप ठोकले. विशेष म्हणजे अनेक कार्यालयात अधिकारी, कर्मचारी त्यावेळी होते. गेवराईमध्ये महामार्गावर रास्ता रोको आंदोलन पहावयास मिळत आहे तर गावागावांत सरकारच्या अंत्ययात्रा निघत आहेत. वडवणी तालुक्यात बंदची हाक देण्यात आली आहे. एकूणच आंदोलन प्रचंड चिघळले असून संतप्त मराठा जरांगेंचा जिव वाचवा, मराठ्यांना आरक्षण द्या, अशी मागणी लावून धरत आहेत.
पंकज कुमावतांच्या गाडीवर दगडफेक बॉडीगार्डसह चालक जखमी
आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक अन् जाळपोळ झाल्याची माहिती मिळताच आयपीएस पंकज कुमावत यांनी घटनास्थळी आपल्या बॉडीगार्डसह धाव घेतली. मात्र त्यांना जमावाने अडवत त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यामध्ये त्यांचा बॉडीगार्ड आणि चालक जखमी झाले आहेत. बॉर्डीगार्डला 6 टाके पडले असल्याची माहिती मिळते.