जम्मू काश्मीर (वृत्तसेवा): मराठा आरक्षणावरून महायुतीतच महाभारत सुरू आहे. आरक्षणावरून भुजबळांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकेनंतर, वादग्रस्त वक्तव्यानंतर आता महायुतीतील नेत्यांमध्ये वादावादी सुरु झाली आहे. ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार आहे. ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नका, असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भुजबळांना दिला आहे. जम्मू कश्मीरमधील कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर एबीपी माझाशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार आहे ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नका. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार आहे. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही.