31 मार्चच्या आत या घरकुलला मंजुरी देण्याचे सरकारचे सीईओंना आदेश
बीड (रिपोर्टर): ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी या वर्षी नव्याने मोदी आवास योजना सुरू करण्यात आली असून बीड जिल्ह्याला 15963 घरकुलांचे टार्गेट दिलेले आहे. ही योजना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत राबवायची असून 31 मार्च 2024 च्या आत या घरकुलांना मंजुरी देऊन त्यांना बांधकाम करण्याचे आदेश सीईओंनी द्यावेत, असेही सरकारच्या आदेशात म्हटले आहे.
बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संगीता देवी पाटील यांनीही राज्य सरकारच्या या आदेशासोबत लागोलाग बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांना उद्दिेष्टानुसार टार्गेट वाटप केलेले आहे. त्याअनुषंगाने अंबाजोगार्स 1560, आष्टी 1305, बीड 1358, धारूर 1138, गेवराई 2340, केज 2142, माजलगाव 1433, परळी 1954, पाटोदा 622, शिरूर कासार 1529, वडवणी 554 असे एकूण बीड जिल्ह्याला 31 मार्च 2024 च्या आत 15936 घरकुले बांधकाम करावयाचे आहेत. याबाबत तालुक्यातील ओबीसी घटकातील लाभार्थ्यांचे प्रस्ताव ग्रामपंचायतकडून मागवून पंचायत समिती यांच्याकडू बीड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला प्राप्त करून घ्यावयाचे आहेत. ओबीसी घटकातील धनगर, माळी, गोसावी, वंजारी आदी वर्गातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे, असेही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगीता देवी पाटील आणि घरकुल योजनेचे सोळंके यांनी म्हटले आहे.