आष्टी (रिपोर्टर): 21 वर्षीय युवतीचे नग्न छायाचित्र काढून तिला ब्लॅकमेल करून तब्बल 5 वर्षांपासून शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत घडला असून या प्रकरणी पिडितेच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यामध्ये कलम 376, पोक्सो आणि अनुसूचित जाती प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची माहिती अशी की, 2018 मध्ये एका 16 वर्षीय मुलीला आरोपी सागर सहदेव रक्ताटे या 21 वर्षीय तरुणाने दुपारच्या वेळी घरी कोणी नसल्याची संधी साधत पिडितेला घरी बोलावले. ही अल्पवयीन पिडिता आरोपीच्या घरी आली तेव्हा तिला पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले आणि नग्न छायाचित्र काढून आपल्या मोबाईलमध्ये सेव केले. त्यानंतर 2022 म्हणजेच 5 वर्षे पिडितेला छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. दरम्यानच्या काळात 2022 मध्ये या पिडितेचे लग्न झाल्यावर तिच्याकडून धमकी देत तिच्या पतीचा नंबर मिळवला. या नंबरवर आरोपीने इन्स्टाग्रामच्या फेक अकाऊंटवरून पिडितेच्या पतीलाही नग्न छायाचित्रे पाठविले. त्यानंतर मात्र या पिडितेला तिच्या पतीने सोडून दिल्याने ती पुणे या ठिकाणी आपल्या मामाकडे राहू लागली. तिने काही दिवसांपूर्वी हा सर्व प्रकार आपल्या मामाला सांगितल्यावर काल अंभोरा पोलीस ठाण्यात ब्लॅकमेल आणि शारीरिक अत्याचारप्रकरणी तक्रार दिली.