पिंपळनेर (रिपोर्टर) घरातल्या कारणातून सोयर्यांमध्ये झालेल्या मारामारीच्या घटनेत जखमी झालेले 49 वर्षीय राजाभाऊ माळी यांचा आज उपचारा दरम्यान औरंगाबाद येथील रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने पिंपळनेरमध्ये खळबळ उडाली असून आरोपींविरुध्द कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येते.
याबाबत अधिक असे की, गेल्या तीन दिवसांपासून पिंपळनेर येथे माळी कुटुंब आणि गव्हाणे कुटुंब या पाहुण्यारवळ्यात घरगुती कारणावरून वाद झाला. वादाचे रुपांतर थेट मारामारीत झाले. या घटनेत दोन्ही गटाकडील तीन ते चार जण जखमी झाले होते. जखमींना बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील जखमी राजाभाऊ माळी यांची प्रकृती अधिक गंभीर होत चालल्याने त्यांना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. आज सकाळी उपचार घेत असताना राजाभाऊ माळी यांचा मृत्यू झाला. या घटनेने पिंपळनेरमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्याभराच्या कालखंडात पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनासारख्या गंभीर तीन घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात 302 नुसार गुन्हा दाखल होणार आहे.