बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील काही मल्टिस्टेटमध्ये ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत. ठेवीदारांना त्यांच्या ठेवी द्याव्यात यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक वेळा आंदोलन करण्यात आले. मात्र तरीह त्यांना पैसे मिळत नसल्याने आज ठेवीदारांनी दणका मोर्चा काढला. हा मोर्चा सचीन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.

ज्ञानराधा, जिजाऊ, साईराम, राजस्थानी, लक्ष्मीमाता, मराठवाडा अर्बन (माजलगाव), मातोश्री, द्वारकानाथ मंत्री सहकारी बँक यामध्ये ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत. अनेक ठेवीदारांना शिक्षण, आरोग्य यासह इतर कामांसाठी पैसे आवश्यक असतानाही त्यांना ते पैसे मिळत नसल्याने ठेवीदार अडचणीत आले. ठेवीदारांच्या ठेवीसाठी सचीन उबाळे यांनी अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन केले. त्यांना 1 फेब्रुवारी रोजी पैसे मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आश्वासनाची पुर्तता झाली नसल्याने आज ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दणका मोर्चा काढला. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघाला होता. या मोर्चात अनेक ठेवीदार सहभागी झाले होते.












