बीड, (रिपोर्टर)ः- गेवराई तालुक्यातून नगरला वाळु वाहतूक करू देण्यासाठी एका पोलिस कर्मचार्याने 15 हजार रूपयांची लाच मागितली होती. सदरील ही लाच एका हॉटेल व्यवसायीकाच्या माध्यमातून स्विकारण्यात आली होती. 15 हजार रूपये घेतांना हॉटेल चालकाला शासकीय विश्रामगृहात ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलिस कर्मचार्यासह हॉटेल चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
एम.एच.14.एच.यु.2878 पासींगचा हायवा गुंजेगाव पाथरवाला ता.गेवराई जि.बीड येथून शेवगाव ता.अहमदनगर येथे वाळु वाहतुक करू देण्यासाठी पोलिस कर्मचारी मुकेश काशिनाथ गुंजाळ यांनी 15 हजार रूपयांची मागणी केली होती. याबाबत संबंधितांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. 6 फेब्रुवारी 2024 रोजी गुंजाळ यांनी पैसे घेण्यासाठी हॉटेल चालक प्रमोद विठ्ठलराव कोठेकर यांना शासकीय विश्रामगृहावर पाठवले होते. पैसे घेतांना कोठेकर यास लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले. ही कारवाई गुलाब बाचेवाड पोलिस निरिक्षक, शंकर शिंदे, श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, अविनश गवळी, गणेश म्हेत्रे, अंबादास पुरी, स्नेहल कोरडे यांनी केली. सदरील कारवाई संदिप आटोळे पोलिस अधिक्षक छत्रपती संभाजी नगर, अप्पर पोलिस अधिक्षक मुकूंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली केली.












