गेवराई, (रिपोर्टर)ः- गेल्या 75 वर्षात मराठा समाजासाठी एकही कायदा झाला नाही. आतापर्यत मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं असतं तर मराठा समाज आर्थिक दृष्टयाच नव्हे तर सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहिला असता. मराठे मुंबईला शांततेत गेले आणि शांततेत आरक्षण घेवून आले. कोणी म्हणतं मुंबईला जावून काही उपयोग झाला नाही. मी सांगतो अधिसुचना निघाली आता त्याचे कायद्यात रूपांतर होईल हा मराठ्यांचा विजय आहे. या आंदोलनाने काहीच मिळालं नाही म्हणणार्यांना माझे आव्हान आहे गेल्या 75 वर्षात आज ज्या नोंदी सापडत आहेत त्या का? सापडल्या नाही या नोंदीमुळे आतापर्यंत दिड कोटी मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळत असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सांगत आता मराठ्यांनो एकत्रित राहणं सोडू नका, जे लोक मराठ्यांच्या जिवावर दुकानदारी करत होते. त्यांचे दुकान आपण बंद केल्याचे जरांगे यांनी म्हंटले आहे.

ते गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे गावकर्यांशी संवाद साधत होते. आज मनोज जरांगे पाटील हे गेवराई तालुक्यात आले असता त्यांनी सर्व प्रथम तलवाडा येथील त्वरीता देविचे दर्शन घेतले नंतर मोगलगाव येथे बैलगाडी शर्यतीचे उदघाटन केले. याच तालुक्यातील गंगावाडी येथील गावकर्याच्या आग्रहा खातर गंगावाडी गावाला भेट दिली. यावेळी गावकर्यांनी जरांगेंचे जल्लोषाता स्वागत केले या स्वागत कार्यक्रमाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर जरांगे यांनी उपस्थितांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले, सगेसोयरे हा शब्द सोपा वाटतो, पण कायद्यात घेणे प्रचंड अवघड आहे. मात्र मराठ्यांच्या एकीमुळे तो कायद्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मराठे मुंबईत शांततेत गेले आणि शांततेत आरक्षण घेवून आले. काही लोक म्हणत आहेत काहीच मिळालं नाही. अरे बाबा कायद्याचं राज्य आहे. कुठलीही गोष्ट इथे कायद्याने करावी लागते. त्या दिवशी अधिसुचना निघाली. अधिवेशन सुरू असतं तर त्याच वेळेस कायद्यातही रूपांतर करून घेतलं असतं. या अधिसुचनेच्या बळावर आता अधिवेशनात कायदा होईल अन् जे कोणी काहीच मिळालं म्हणत नाहीत ना. अहो गेल्या 75 वर्षात मराठ्यांसाठी एकही कायदा झाला नाही. तो आता तुमच्या सर्वाच्या एकीने होतो. 75 वर्षात नोंदी का सापडल्या गेल्या नाहीत. त्या आत्ता सापडत्यात लोकांना त्याचा फायदा होतो ? या आरक्षणातून मराठ्यांची पोरं क्लास 4 पासुन क्लास 1 पर्यंत दिसली पाहिजेत असे म्हणत जरांगे यांनी भुजबळांच नाव न घेता यवल्याच्या एटपटावर टिका केली. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणुन सातत्याने भुजबळ विरोध करतात. पडद्या आडून पैसा पुरवतात. आता ही अधिसुचने विरोधात ते कोर्टात गेले आहेत.












