———————-
गेवराई (रिपोर्टर) मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगेसोयरे अध्यादेशाची शिंदे सरकारने अंमलबजावणी लवकरात लवकर करावी व मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण संपेपर्यंत गेवराई तालुक्यातील महिला पुरुष यांच्या वतीने तहसील कार्यालय गेवराई येथे आजपासून बेमुदत जेलभरो आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
राज्यभर सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात गेल्या सहा महिन्यापासून सभा आंदोलने सुरू आहेत. राज्यभर सकल मराठा रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. सर्व मराठा समाज जरांगे पाटलाच्या नेतृत्वात एकवटला असून आता माघार नाही. त्यांच्या मुंबई आंदोलनाची दखल म्हणून सरकारने सगेसोयरे बाबत अध्यादेश काढला त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी यासाठी विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा अशा प्रकारची आग्रही भूमिका जरांगे पाटलाच्या नेतृत्वात मराठा समाजाने घेतली आहे. त्यासाठी अंतरवाली सराटी येथे 10 जानेवारी पासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे. या उपोषण दरम्यान त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना भेटण्यासाठी राज्यभरातील लाखो मराठा समाज बांधव अंतरवाली मध्ये दाखल होत आहेत. दरम्यान त्यांच्या या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज गेवराई तालुक्यातील मराठा समाज बांधवांच्या वतीने तहसील कार्यालय गेवराई येथे सकाळी 11:00 वाजल्यापासून बेमुदत जेल भरो आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.












