पिंपळनेर परिसरातील शेकडो गावांचा आंदोलनामध्ये सहभाग
चौसाळा-पारगाव परिसरात रस्ता रोखल्याने धुळे-सोलापूर महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प; गढी-माजलगाव रोडवर लोणावळा फाट्यावर रस्ता रोखून धरला; परळीत मराठ्यांचे धरणे सुरू, गेवराईत महिलांचा जेलभरो
माजलगाव/घाटसावळी/चौसाळा/परळी/गेवराई (रिपोर्टर): मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे उपोषण आठव्या दिवशीही सुरू आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने होत असून आज धुळे-सोलापूर महामार्गावर अनेक ठिकाणी आंदालने झाले तर इकडे बीड-परळी रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परळीत ईटके चौक मराठ्यांनी अडवून धरला, घाटसावळी येथे हजारोंच्या संख्येत महिला-पुरुषांनी रास्ता रोखून धरल्याने तीन तास वाहतूक ठप्प झाली तर तिकडे माजलगावमध्ये मोंढा मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात आले. गेवराईमध्ये तहसीलच्या दारात बसून महिलांसह पुरुषांनी जेलभरो आंदोलन केले.

अंतरवली सराटीत गेल्या सात ते आठ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पािंंठंबा देण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठ्यांनी रस्त्यावर उतरून धरणे, रास्ता रोको, जेलभरो आंदोलन सुरू ठेवले. त्यामुळे धुळे-सोलापूर महामार्गासह बीड-परळी महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाल्याचे पहावयास मिळाले. चौसाळा ते पारगाव या दरम्यान मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले. इकडे पिंपळनेर परिसरातील शेकडो गावच्या महिला-पुरुषांनी घाटसावळी येथे रस्त्यावर उतरत सकाळी 10 वाजल्यापासून महिला-पुरुषांनी रस्ता रोखून धरला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा दिसून येत होत्या. ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. सत्ताधारी जाणीवपुर्वक मराठा आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उपस्तित आंदोलकांनी केला. जोपर्यंत सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलनाची धार कमी होणार नाही, असा इशाराही आंदोलकांनी दिला. राष्ट्रीय महामार्ग 52 माजलगाव-गढी रोडवर लोणावळा फाटा या ठिकाणी मराठा समाजाने रस्त्यावर उतरून गढी-माजलगाव महामार्गा रोखून धरला.












