गणेश सावंत
अखंड हिंदुस्तानच्या लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. अठराव्या लोकसभेसाठी मतदानाचे चार टप्पे पार पडले आहेत. अशा आनंदमय आणि भविष्याचा वेध घेणार्या वातावरणात देशातल्या तरुणांच्या भविष्यावर भाष्य करण्याऐवजी सत्ताधार्यांकडून जात-पात-धर्म-पंथ आणि मंदिर-मस्जिदचे उदात्तीकरण होतय. भारतीय जनता पार्टी आणि त्या पक्षाचे सर्वेसर्वा व नुमाइंदे सर्रासपणे जाती-पातीचे आणि धर्माचे एकीकडे उदात्तीकरण करतायत तर दुसरीकडे त्या उदात्तीकरणातून धार्मिक द्वेषाबरोबर मताचे धु्रवीकरण करू पाहतायत. परंतु जेव्हा मंदिर-मस्जिदचा मुद्दा चालत नाही, जेव्हा जात आणि धर्माच्या ध्रुवीकरणावर मताचा टक्का वाढत नाही, तेव्हा यू टर्न घ्यावाच लागतो. आणि तो यू टर्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल गंगा नदी किनारी घेतला. आपण निखळ खळखळ वाहणार्या या पाण्याप्रमाणे सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारे आहोत, नव्हे नव्हे तर हिंदू मुस्लिम भेदभाव केला तर मी सार्वजनिक जीवनात राहण्याच्या पात्रतेचा उरणार नाही, असे निबर (हा शब्द फक्त मोदींसाठीच) वक्तव्य केले. मोदींच्या या वक्तव्यात त्या नदीच्या पाण्यासारखा निखळपणा असेल, तर देर आये दुरुस्त आये’ असं म्हणत अवघा देश स्वागतच करेल.
देशात हिंदू-मुस्लिमात द्वेष कोण पसरवतो, हिंदुस्तानात हिंदु-मुसलमान करणारा पक्ष कोणता? देशातल्या मुस्लिमांच्या वेषासह दाढीवर भाष्य करणारे कोण? धार्मिक द्वेष पसरवणारे कोण? धार्मिक द्वेषातून मताचे धु्रवीरकरण करणारे कोण? या प्रश्नांचे उत्तर देशातल्या हिंदुंना विचारले आणि मुसलमानांनाही विचारले तर ते लागलीच देतील. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका सकारात्मक आणि उदारदील वक्तव्यावर आम्ही कटाक्ष टकतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल म्हणाले, या देशातील नागरीक माझ्यासाठी मतदान करतील, हा मला विश्वास आहे. ‘मी ज्या दिवशी हिंदू आणि मुसलमान असा भेदभाव करण्यास सुरुवात करेल त्या क्षणापासून मी सार्वजनिक जीवनात उरण्याच्या पात्रतेचा नसेल, हिंदू-मुस्लिम भेदभाव करायचा नाही, हा माझ्या दृढ निश्चय आहे’ वाह! वाह! पंतप्रधान मोदींचे हे वक्तव्य एखाद्या झर्यातून निखळ वाहणार्या झुळझुळ पाण्यासारखे. मात्र गेल्या दहा वर्षांच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात मुस्लिमांना वागवण्यात आले, मुस्लिमांविरोधात दस्तुरखुद्द पंतप्रधानांसह त्यांच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकार्यांनी जे वक्तवये केले. आणि त्या वक्तव्यातून जो धार्मिक द्वेष पसरला, धर्माच्या नावावर माणूस माणसापासून दुरावला, त्याचे काय? कधी जाहीर सभांमधून मुस्लिमांच्या टोपीपासून पेहराव्यापर्यंत भाष्य केले गेले, त्यांच्या दाढीवरही भाष्य करून विशिष्ट समाजाची ओळख अस्पष्टपणे करून दिली. नव्हे नव्हे तर काल-परवा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बसवारा येथे जी सभा घेतली त्या सभेत काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, ‘पूर्वी त्यांचे सरकार होते, तेव्हा त्यांनी म्हटले होते, देशातील संपत्तीवर पहिला हक्क मुसलमानाचा आहे. याचा अर्थ ते संपत्ती जमा करून कोणाला वाटणार, ज्यांची जास्त मुलं आहेत, त्यांना वाटणार, घुसखोरांना वाटणार, तुमच्या मेहनतीची कमाई घुसखोरांना दिली जाणार, तुम्हाला ही गोष्ट मंजूर आहे?’ मोदींचे हे वक्तव्ये आणि त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ आल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले होते, ‘कर्नाटक में एक रात में मुसलमानों को ओबीसी बनाया, वैसे मै यहॉ होने नही दुँगा ये मोदी की गॅरंटी है’ मोदींच्या मुखातून निघालेले हे मुस्लिमविरुद्धचे आणि असे कित्येक वक्तव्ये मुस्लिमांचा द्वेष करणारे आहेत, यात दुमतच नाही, परंतु आज जेव्हा 400 पार की नैय्या पार होत नाही आरि त्यासाठी मुसलमानांची गरज आहे हे लक्षात येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून आपण मुस्लिमांविरोधात नाही, मी मुस्लिम कुटुंबात जेवलो, राहिलो, खेळलो, बागळलो असे एक ना अनेक मुस्लिम प्रेमाचा उमाळा मोदींना आला. खरं तर आम्हाला इथे आनंदही होतोय आणि हास्यही येतय. कडवट हिंदुत्व, हिंदुंचा मसीहा म्हणून मोदींकडे जे लोक पाहत होते आणि आपल्या शेजारच्या मुसलमानाला दुश्मन समजत होते, त्यांचे तर गलितगात्रच झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या वक्तव्यावर ते जर त्या नदीच्या निखळ पाण्यासारखे स्वच्छ असतील तर मोदींच्या वक्तव्याचे स्वागत आणि केवळ दिल्ली तख्त डळमळीत होतय म्हणून मानसिक तडजोडीतून हे वक्तव्ये होत असेल तर दुर्दैव. हा अखंड हिंठदुस्तान लोकशाहीचा देश आहे, हा देश सर्व जात-पात-धर्म-पंथाच्या सर्वसामान्य नागरीकांनी रक्ताच्या थेंबातून आणि बलिदानातून उभा केला आहे, त्या देशात गेल्या दहा वर्षांच्या कालखंडात ज्या पद्धतीने मंदिर-मस्जिदचे राजकारण झाले, ज्याप्रमाणे हिंदु-मुस्लिमात द्वेष पसरवण्यात आला, त्यातून जी काही दरी निर्माण झाली ती भरून येणारी नाही, अशा वेळी संत ज्ञानेश्वर म्हणतात,
हमाम घाली बाळा । सांडी खोटा चाळा । फोडीन तुझा टाळा । वाकुल्या दावीन काळा ॥
हामामारे पोरा हामामारे । हामामा घाली बारे । अंगी भरले वारे । चाखती पिकली चारे । जावू वरल्या द्वारे ॥
याचा अर्थ हमामा घाल, प्रपंचाचा, सत्तेचा खोटा चाळा सोडून दे, देह अभिमानाचा तुझा खोटा चाळा आहे त्यामुळे काळ नाश करतो, परंतु त्या देह अभिमानाचे टाळके फोडून त्याला बाद कर म्हणजे तुझा नाश करणार्या काळाला एकप्रकारे वाकुल्या दाव.
आम्हीही म्हणतो, जात-पात-धर्म-पंथ यापेक्षा माणूस धर्माला अनन्यसाधारण महत्व द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी देर आये दुरुस्त आहे, असं जर कोणी म्हणत असेल यापेक्षा मोदींच्या कालच्या वक्तव्यातले पावित्र्य शोधावेच लागेल. कारण हा माणूस खोटं बोलतोय, असे अनेकांचे मत आहे. सत्ताकारणातलं मत तुम्हाला साम-दाम-दंडातून घेता येईल, मात्र तुमच्या बद्दल देशवासियांच्या मनात आणि अंत:करणात जे मत होतय ते मत बदलणं गरजेचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, दोन दिवसांपूर्वी फुटीच्या काखेतले प्रफुल्ल पटेल यांनी अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवरायांचा जिरे टोप नरेंद्र मोदींच्या मस्तकी रोवला अन् दुसर्याच दिवशी गंगा किनारी मोदींना माणसातला धर्म नव्हे तर माणसातला माणूस दिसला. प्रफुल्ल पटेलांच्या कृतीव देशातून जेव्हा हल्लाबोल झाला, तेव्हा अशा चुका होणार नाहीत, असे प्रफुल्ल पटेलांनाही ट्विट करून सांगावे लागले, तात्पर्य एवढेच, छत्रपतींच्या जिरे टोपाने माणसात माणूसपण येतय, असा एक आम्ही मॅसेज वाचला. पंतप्रधानांच्या मुखातून जे निघाले ते टिकावे. एवढीच अपेक्षा.











