विजेचा लपंडाव थांबवा; जिल्हाभरातील नागरिकांची शासन-प्रशासन व्यवस्थेकडे मागणी, गेवराईत रस्ता रोको
बीड/गेवराई (रिपोर्टर) मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असणारे तापमान यावर्षी एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात वाढत असल्याने उन्हाच्या भडक्याबरोबर मरणाच्या उकाड्याला सर्वसामान्यांना सामोरे जावे लागत असतानाच वीज कंपनी गेल्या काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत पुरवत नाही, सातत्याने विजेचा लपंडाव पहायला मिळतो. लोडशेडींगच्या नावाखाली अधिकृतपणे वीज पुरवठा खंडीत केला जातो. यामुळे सर्वसामान्यात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून ज्या दादागिरीने आणि हक्काने वीज बिलाची वसुली केली त्यानुसार कंपनीने विद्युत पुरवठा नियमित आणि सुरळीत करावा, अशी मागणी होत असून लोडशेडींगच्या विरोधात गावागावात आणि घराघरात प्रचंड संताप आणि संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या दोन महिन्यांच्या कालखंडात वीज कंपनीने अत्यंत काटेकोरपणे वीज बिलाची वसुली केली. जे लोक पैशे देत नाहीत, त्यांचे वीज कनेक्शन तोडले. कोणी सर्वसामान्य कर्मचार्यांना काही बोलला तर त्या सर्वसामान्यावर कंपनीने गुन्हे दाखल केले. अक्षरश: गचुर्याला धरून वीज बिलाची वसुली केली. मात्र जेव्हा जिल्ह्यातील सर्वसामान्यांना विजेची गरज आहे तेव्हा वीज कंपनी सुरळीत वीज पुरवठा करत नाही, अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव होतो तर लोडशेडींगच्या नावाखाली अधिकृतपणे वीजपुरवठा खंडीत केला जातो. यावर्षी उन्हाळा प्रचंड आहे, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जे तापमान असते ते तापमान यावर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पाहण्यास मिळाले आहे. उन्हाचा भडका प्रचंड उडाला आहे, मरणाच्या उकाड्याने सर्वसामान्यांचा जीव कासावीस होत आहे. त्यात लोडशेडींगचा तडका दिला जात असल्याने सर्वसामान्य नागरीक या जाचात होरपळून निघत आहे. अशा परिस्थितीत शहरासह ग्रामीण भागातील नागरिकात संताप व्यक्त केला जात असून लोडशेडींग बंद करून नागरिकांना 24 तास वीज पुरवठा करा, अशी मागणी सर्वस्तरातून होताना दिसून येत आहे. वीज कंपनीविरोधात लोक आता रस्त्यावरही उतरताना दिसून येत आहेत.
संताप..संताप आणि संताप! उन्हाचा भडका, मरणाचा उकाडा, लोडशेडींगचा तडका, गचुर्याला धरून बील वसुली केली आता लोडशेडींग बंद करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.