परळी (रिपोर्टर): मागील दोन-तीन महिन्यांपासून दुष्काळाच्या झळा गडद होत असून दिवसेंदिवस शहरासह ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होत आहे. अनेक गावात विहीरी व विंधनविहीरी अधिग्रहण केल्या आहेत तर काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू केला टँकरची मागणी येताच तहसील आणि पंचायत समिती मार्फत तात्काळ कार्यवाही करण्यात येत आहे.
परळी शहर हे पाण्यावर उभे आहे. शहराला कधीच पाणी कमी पडत नाही अशी शहराची जुनी याख्यायिक होती मात्र जसजशी शहराची व्याप्ती आणि लोकसंख्या वाढत गेली तसेच काही वर्षांपासून सतत पडणार्या दुष्काळामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे नागापुरचे वाण धरण दिवसेंदिवस कोरडे पडत गेल्याने शहरात नगरपालिकेच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.मागील तीन वर्षापुर्वी जो दुष्काळ पडला त्यावेळी शहरात विविध भागात विंधनविहीरी घेतल्या गेल्या. हजार ते बाराशेच्या आसपास विंधन विहिरी घेण्यात आला मात्र आजमितीस अनेक विंधन विहिरी कोरड्या पडल्या आहेत.परतीच्या पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे वाण धरण 70 टक्के भरले त्यावरच परळी शहराचा पाणी पुरवठा सुरू असून अद्याप तरी पाण्याचे मोठे दुर्भिक्ष शहरात पहावयास मिळाले नाही.
परळी तालुक्यातील ग्रामीण भागात रामेवाडी, सिरसाळा,रेवली,लेंडेवाडी,जिरेवाडी,आचार्य टाकळी,पिंपरी बु,जळगव्हान व नागपिंपरी या ठिकाणी टँकर सुरू करण्याबाबत ग्रामस्थांनी मागणी केली असता तहसील प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करत रामेवाडी, सिरसाळा,रेवली आणि लेंडेवाडी या ठिकाणी टँकर सुरू केले असून उर्वरित गावात टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली असून लवकरच टँकर सुरू करण्यात येतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.दरम्यान टँकरने पाणी पुरवठा होत असलेल्या गावात तहसील आणि पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचारी यांनी अचानक भेट देत टँकरद्वारे होत असलेला पाणी पुरवठा, पाण्याचा दर्जा आदींची पाहणी केली. या पाहणी दौर्यात तहसीलदार व्यंकटेश मुंडे, गट विकास अधिकारी नागरगोजे,नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांच्यासह संबंधित गावाचे तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते.














