बीड (रिपोर्टर): उसनवारी पोटी 15 लाख 50 हजार रुपये एकास देण्यात आले होते. या पैशापोटी संबंधिताने चेक दिला होता. मात्र तो चेक बँकेत वटला नसल्याने आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून हे प्रकरण कोर्टात दाखल करण्यात आले होते. कोर्टाने आरोपीला 18 लाख रुपयांचा दंड करून 6 महिन्यांची शिक्षा ठोठावली.
शेख पाशा शेख नबी यांनी बिपिन एकनाथ घोरपडे यास गरजेपोटी 15 लाख 50 हजार रुपये उसने दिले होते. ठरल्याप्रमाणे पैसे परत न करता फिर्यादी शेख पाशा यांना घोरपडे याने कॉर्पोरेट बँक शाखा इमान नगर पुणे येथील खात्याचे 9 लाख व 6 लाख 50 हजार असे एकूण 15 लाख 50 हजार रुपयांचे चेक दिले होते. शेख पाशा यांनी सदरील चेक बँकेत जमा केले असता ते वटले नाही. त्यामुळे पाशा यांनी घोरपडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हे प्रकरण बीड येथील प्रथम न्यायालयात सुरू होते. न्यायालयाने आरोपी बिपिन घोरपडे यास दोषी ठरवून 18 लाख रुपये दंड व सहा महिन्याची जेलची शिक्षा सुनावली. फिर्यादी शेख पाशा यांच्या वतीने अॅड. भीमराव यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. व्ही. डी.पंडित, अॅड. एल.आर. जगताप, अॅड. चव्हाण, अॅड. बी.डी. जगताप यांनी सहकार्य केले.










