बीडमध्ये शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले
बीड (रिपोर्टर): बीड (रिपोर्टर): निटच्या परीक्षेमध्ये घोटाळा झाला असून या प्रकरणाला शासन जबाबदार आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी शासनाने खेळणे बंद करावे या मागणीसाठी आज बीडमध्ये एसएफआय रस्त्यावर उतरली होती. संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला होता. या मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.
नीट-यूजी, यूजीसी-नेट परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे. तसेच सीएसआयआर-नेट, नीट-पीजी या परीक्षेच्या तारखांबाबत गोंधळ सुरु आहे. नीट आणि नेट या परीक्षा एनटीए या संस्थेमार्फत घेतल्या जातात. त्यात मोठी अनियमितता आहे. याबाबत एसएफआयने ’हल्ला बोल मोर्चा’ आयोजित केला. एसएफआयने याबाबत देशव्यापी व्यापक मोहीम हाती घेतली असून एसएफआय सर्वत्र सातत्याने मोर्चे, आंदोलन, निदर्शने करत आहे. त्यातून एसएफआय विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी करते आहे. तसेच याबाबत एसएफआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केलेली आहे.
नीट, नेट, इतर अनेक प्रवेशपूर्व आणि भरती परीक्षेत गोंधळ सुरु आहे. याला संपूर्णपणे भाजपचे सरकार जबाबदार आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे त्वरित थांबवले पाहिजे. म्हणून या मोर्चातून नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, नीटची फेरपरीक्षा घेण्यात यावी, या मागणी साठी हा मोर्चा एसएफआयने काढला.
शहरातील बशीरगंज चौक येथून मोर्चाची सुरुवात झाली, मोर्चा नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. यावेळी एसएफआयच्या आंदोलक विद्यार्थ्यांनी ’हल्ला बोल’च्या दिलेल्या घोषणांनी शहराचे लक्ष वेधले होते. या मोर्चात जिल्हाभरातील वेगवेगळ्या तालुक्यातून विद्यार्थी सहभागी होतील.या ’हल्ला बोल मोर्चा’चे नेतृत्व एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य उपाध्यक्ष सत्यजित मस्के, जिल्हा अध्यक्ष लहू खारगे, राज्य सचिवमंडळ सदस्य संतोष जाधव, जिल्हा सचिव विष्णू गवळी, राज्य कमिटी सदस्य अंकुश कोकाटे यांनी केले. मराठवाडा शिक्षक संघाचे नेते डी. जी. तांदळे, डीवायएफआयचे जिल्हा सचिव विशाल देशमुख, प्रशांत मस्के, सुहास जायभाये, विनायक चव्हाण, विजय राठोड यांनी मोर्चात सामील होऊन सक्रिय पाठिंबा दर्शवला. तर शिवा चव्हाण, पवन चिंचाणे, ज्योतिराम कलेढोण, अक्षय वाघमारे, अभिषेक अडागळे, आरती साठे, हर्षद डाके, पल्लवी कासारे, अनिल राठोड, गणेश राठोड, यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.