पुणे (रिपोर्टर): उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक तथा ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी काल अचानकपणे शरद पवारांची भेट घेतल्यानंतर लगेच दुसर्या दिवशी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सौभाग्यवती खा. सुनेत्रा पवार यांनी पुण्याच्या मोदी बागेत जाऊन शरद पवारांसह खा. सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. भुजबळांपाठोपाठ खा. सुनेत्रा पवारांच्या भेटीने पवार कुटुंबियात काय शिजतय यावर राज्यभरात चर्चा होत असून काल भुजबळांनी ‘आपली भेट राजकीय नसल्याचे सांगितले होते, मात्र सुनेत्रा पवार यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जाऊन उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री पदावर विराजमान झाले. अजित पवार यांनी अचानकपणे घेतलेल्या निर्णयाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्या घटनेला बराच कालावधी उलटून गेला आहे. त्या दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा निवडणुक लढवली. या निवडणुकीत कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र अखेर या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. त्यानंतर पुढील अगदी काही दिवसांत सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड करण्यात आली.
या संपूर्ण कालावधीत पवार कुटुंबीय एकमेकांना भेटल्याचे दिसून आले नाही. त्याच दरम्यान पुण्यातील शिवाजीनगर भागातील मोदी बागेतील शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानी सकाळच्या सुमारास सुनेत्रा पवार यांनी या दोघांची जवळपास तासभर भेट घेतली. यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी काल (15 जुलै) शरद पवार यांची भेट घेतली होती. छगन भुजबळ यांनी आज अचानक शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, भेटीनंतर छगन भुजबळांनी याबाबत प्रतिक्रिया देत आपली ही राजकीय भेट नसून राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवर असल्याचे सांगितले होते. या भेटीच्या दुसर्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी शरद पवार व सुप्रिया सुळेंची निवास्थानी जाऊन भेट घेतली आहे.