परळी-नगर कामाला गती देणे, परळी ते मुंबई स्वतंत्र रेल्वे, एक्सप्रेस गाड्यांना घाटनांदूर येथे थांब्यासाठी रेल्वे मंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा
कृषिमंत्री धनंजय मुंडे, आ.पंकजा मुंडेंना जनहित लक्षात घेत विकासकार्य करण्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा शब्द
मुंबई (रिपोर्टर): परळी वैद्यनाथ ते परभणी रेल्वे रूळ दुहेरीकरण करण्यासाठी कुणाचाही विरोध नाही, मात्र यासाठी भूसंपादन करताना कुणाचेही राहते घर बाधित होऊ नये. त्यासाठी भूसंपादन करताना दक्षिण ऐवजी मूळ रुळाच्या उत्तर बाजूने भूसंपादन केले जावे तसेच भूसंपदान करण्यासाठी 19 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले राजपत्र स्थगित करावे, अशी मागणी आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना समस्त परळीकरांच्या वतीने कृषिमंत्री धनंजय मुंडे व आ.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.
परळी-परभणी रेल्वे रूळ दुहेरीकरण संदर्भात सुमारे 350 आक्षेप अर्ज दाखल झाले असून त्याबाबत निर्णय, परळी-बीड-नगर रेल्वे कामाला गती देणे यांसह बीड जिल्ह्यातील रेल्वे विषयक विविध मागण्यांच्या संदर्भात कृषिमंत्री धनंजय मुंडे, आ.पंकजाताई मुंडे व शिष्टमंडळाने गुरुवारी सायंकाळी मुंबई येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन निवेदन सादर करत सविस्तर व सकारात्मक चर्चा केली. मंत्री श्री.अश्विनी वैष्णव यांनीही सर्व मागण्या समजून घेत त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.
परळी-बीड-अहिल्यानगर (अहमदनगर) रेल्वे कामाला परळीच्या बाजूने देखील सुरुवात करण्यात यावी, परळी ते मुंबई स्वतंत्र एक्सप्रेस गाडी सुरू करण्यात यावी, लातूर एक्सप्रेस परळी पर्यंत वाढवण्यात यावी, नांदेड-पनवेल एक्सप्रेस प्रवाशांच्या व भाविकांच्या सोयीसाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत वाढवण्यात यावी. घाटनांदूर मार्गाने जाणार्या एक्सप्रेस गाड्यांना घाटनांदूर येथे थांबा देण्यात यावा, घाटनांदूर परिसरातील राजा भैय्या पांडे यांच्या शेतातून जाणार्या रेल्वे रुळासाठी अंडरपास द्यावा, चोपणवाडी उड्डाणपूल, परळी शहर बायपास, उड्डाणपूल, पादचारी मार्ग आदी ठिकाणी अंडरपास उभे करण्यात यावेत, यांसह बीड जिल्ह्यातील महत्वाच्या रेल्वे विषयक मागण्यांबाबत निवेदनासह सविस्तर चर्चा करण्यात आली.
विकासाचे कार्य अविरत सुरू ठेवत जनतेच्या हितार्थ निर्णय घेणारे आपले सरकार असून, परळी वैद्यनाथ सह बीड जिल्ह्यातील रेल्वे विषयक मागण्यांच्या संदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतले जातील, असा शब्द यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी शिष्टमंडळाला दिला.
यावेळी शिष्टमंडळात ना.धनंजय मुंडे, आ.पंकजाताई मुंडे, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, अय्युब खान पठाण, अजीज कच्छी, इस्माईल पटेल, शंकर आडेपवार, विजय भोयटे, केशव गायकवाड, अनंत इंगळे, दीपक तांदळे, अय्युब बागवान, गफार बागवान, इलियास बागवान, जावेद कुरेशी, रवी मुळे, शकील कच्छी, जाफर बागवान, अजीज पटेल, राजू शेख, महेंद्र रोडे, रेल्वे संघर्ष समितीचे जी.एस.सौंदळे गुरुजी यांसह आदी उपस्थित होते. कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना परळी स्थित पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ प्रभुंच्या दर्शनाचे निमंत्रणही दिले आहे.
रेल्वेमंत्र्यांनी दिला सविस्तर वेळ
रेल्वेमंत्री मुंबईत येणार हे समजताच परळीकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या या प्रश्नाच्या संदर्भात धनंजय मुंडे यांनी मुंबई येथे त्यांची वेळ घेतली. रेल्वेमंत्री हे पक्षाच्या एका बैठकीला आलेले असल्याने प्रचंड व्यस्त असतानाही धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांच्या आग्रहाखातर त्यांनी बैठकीतून व्यस्त वेळ काढून पक्षाच्या कार्यालयातच शिष्टमंडळासोबत चर्चा केली. यावेळी प्रस्तावित रेल्वे मार्ग, त्याचा नकाशा याची स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली. धनंजय मुंडेंनी सादरीकरण करून परिस्थितीची जाणीव करून दिली.