मुंबई -ऑनलाईन रिपोर्टर
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शासकीय विश्रामगृह असलेल्या सह्याद्री अतिथीगृह इथे झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये आरक्षण प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेत आरक्षणावरून निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी आपण मध्यस्थी करावी, अशी विनंती पवार यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आजची भेट झाल्याचे समजते.
सरकारकडून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना नेमकं काय आश्वासन देण्यात आलं आहे, याबाबतची माहिती आजच्या भेटीदरम्यान शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनाही सविस्तरपणे आपल्याकडून कोणती आश्वासने देण्यात आली आहेत, ते सांगितले. तसंच आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाजात निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी आगामी काळात नेमकी काय पावले उचलली जावीत, याबाबत मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांचे मार्गदर्शन घेतले असण्याची शक्यता आहे.
छगन भुजबळ यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतल्यानंतर शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं की, “सरकारच्या लोकांनी जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांना काय आश्वासन देण्यात आलं, याबाबतची माहिती आमच्याकडे नाही. तसंच लक्ष्मण हाके यांचंही उपोषण कोणत्या आश्वासनावर सोडण्यात आलं, याबाबत आम्हाला कल्पना नाही. मात्र मी पुढील एक-दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी यावर चर्चा करतो आणि यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेतो,” असा शब्द पवार यांनी भुजबळांना दिला होता.
काही दिवसांपूर्वी विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते हजर राहिले नव्हते. त्यावरून सत्ताधारी महायुतीने महाविकास आघाडीवर टीका केली होती. तसेच शरद पवार यांच्या सांगण्यावरून महाविकास आघाडीचे नेते या बैठकीले गेले नाहीत, असा आरोपही झाला होता. त्यानंतर छगन भुजबळ यांनी अचानक शरद पवार यांची भेट घेतली होती. तसेच या आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण कलुषित झाल्याचं सांगत परिस्थिती निवळण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली होती. यातून अडचणीच्या ठरलेल्या आरक्षण प्रश्नावर महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलतं करण्याची रणनीती महायुतीने आखल्याची चर्चा रंगत आहे.