नेकनूर (रिपोर्टर): पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरत पाटोदा येथील रामकृष्ण बांगर यांचे चिरंजीव बाळा बांगर याने आपल्या दोन मित्रांसमवेत स्कॉर्पिओमधून येत हिंगणी खुर्द येथील 28 वर्षीय संदीप तांदळे याच्यावर आपल्या पिस्तुलातून चार राऊंड फायर करत गोळीबार केला. या गोळीबारात संदीप तांदळे याच्या मांडीत एक गोळी घुसून ते जखमी झाले. जखमीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सदरची घटना ही मांजरसुंबा – लिंबागणेश रोडवर मुळुकवाडी जवळ घडली. या प्रकरणी बाळा बांगरसह अन्य दोघांविरोधात नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबार करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
याबाबत अधिक असे की, बीड तालुक्यातील हिंगणी खुर्द येथील संदीप तांदळे (वय 28 वर्षे) यांनी पोलिसात एक तक्रारी वजा निवेदन दिलेले होते. याचा राग मनात धरून रामकृष्ण बांगर यांचे चिरंजीव बाळा ऊर्फ विजयसिंह रामकिसन बांगर याने काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ (क्र. एम.एच. 23 बीडब्ल्यू 7689) मधून दोन मित्रांसमवेत मांजरसुंबा -लिंबागणेश रोडवरील मुळुकवाडी जवळ येत तेथे उभा असलेल्या संदीप तांदळे यांच्यावर आपल्या जवळच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यास सुरुवात केली. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल चार राऊंड त्याने फायर केले. त्यातील एक गोळी संदीप तांदळे यांच्या मांडीत घुसली. त्यात संदीप हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी बाळा बांगरसह अन्य दोन आरोपींविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात कलम 109 भारतीय दंड संहिता कलम 3, 25, 27 भारतीय हत्यार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी हे करत आहेत.