बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार वाढत असतानाच आष्टी येथील महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता कोमल शिंदे यांना १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी (दि.२१) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महावितरण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या सौर प्रकल्पाच्या पडताळणीसाठी कोमल शिंदे यांनी मोबदल्याच्या स्वरूपात १८ हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला.
मंगळवारी तक्रारदाराकडून १८ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना कोमल शिंदे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या प्रकरणामुळे महावितरण विभागातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.








