धनंजय मुंडे, पंकजा मुंडे स्व. मुंडेंच्या समाधीशी नतमस्तक
हजारो अनुयायांकडून मुंडेंना वंदन

परळी (रिपोर्टर): आप्पा एक वाट संघर्षाची, कायम आपल्या प्रवासातली, एक वाट आपली कायम विकासाची, आप्पा तुम्ही दाखवलेल्या याच वाटेवर जनतेप्रती निष्ठा ठेवून चालत आलो, व चालत राहील, असं म्हणत आ. धनंजय मुंडेंनी स्व. गोपीनाथराव मुंडे याचंया समाधीशी नतमस्तक होत वंदन केले तर आ. पंकजा मुंडे यांच्यासह मुंडे कुटुंबियांनी समाधीवर पुष्पहार अर्पण करत वंदन केले. या वेळी राज्यभरातून स्व. मुंडे यांचे अनुयायी गोपीनाथगडावर डेरेदाखल झाले होते. प्रत्येक जण मुंडेंच्या समाधीशी नतमस्तक होत अमर रहे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे च्या घोषणा देत साहेबांच्या आठवणींना उजाळा देत होते.

स्व. गोपीनाथराव मुंडे यांची आज जयंती. राज्यासह देशभरातल्या अनेक भागांमध्ये स्व. मुंडेंच्या अनुयायाकडून जयंतीदिनी अभिवादन केले जात आहे. स्व. मुंडेंच्या जयंतीनिमित्त गोपीनाथगडावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी भजनसंध्या दरम्यान आ. पंकजा मुंडे हातात विणा घेत हरिनामाचा गजर करताना दिसून आल्या. राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मुंडेंचे अनुयायी गोपीनाथगडावर डेरेदाखल झाले होते. अमर रहे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे च्या घोषणा देत जो तो मुंडेंच्या समाधीशी नतमस्तक होत होता. राष्ट्रवादीचे नेते आ. धनंजय मुंडे यांनी आज सकाळीच आप्पा एक वाट संघर्षाची कायम आपल्या प्रवासातली, एक वाट आपली कायम विकासाची, आप्पा तुम्ही दाखवलेल्या याच वाटेवर जनतेप्रती निष्ठा ठेवून चालत आलो, व चालत राहील, अशी पोस्ट करत त्रिवार वंदन तर केलेच, सकाळी ते गोपीनाथगडावर जात मुंडेंच्या समाधीशी नतमस्तक झाले.









