बीड, (रिपोर्टर)ः- शहरातील गर्दीच्या ठिकाणी चोरटे नागरीकांच्या खिशातील पैसे, मोबाईल चोरत आहेत. तर महिलांच्या गळ्यातील दागिनेही लंपास करत आहेत. या चोरीच्या घटना शहरातील नवीन भाजी मंडई व बाजारामध्ये जास्त प्रमाणात घडत आहेत. रविवारी सर्वात जास्त चोर्या होतात. या प्रकरणी पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. चोर्या करणारे हे चोरटे नेहमीचेच असतात. ते पाळत ठेवून चोर्या करतात.
बीड शहरातील नवीन भाजी मंडईमध्ये भाजी, फळे खरेदी करण्यासाठी नागरीकांची गर्दी असते या गर्दीचा फायदा उचलत चोरटे नागरीकांच्या खिशातील मोबाईल, पैसे लंपास करत आहेत. तसेच पेठ बीडमध्ये आठवडी बाजार भरतो या बाजारतही नागरीकांचे रेलचेल असते या ठिकाणी देखिल चोरटे पैसे, मोबाईल व सोन्याचे दागिने चोरत आहेत. चोर्या करणार्या या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
मोंढा रोडवर अनेकांना मामा बनवून लुटले
चोरटे वेगवेगळ्या पध्दतीची शक्कल लढवुन नागरीकांना लुटत आहे. तुमच्या खात्यावर पैसे पडणार आहेत, तुमचा विमा आलेला आहे, ही योजना मंजुर झाली, ती योजना मंजूर झाली अशा पध्दतीचे वेगवेगळे फंडे वापरून चोरटे ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरीकांना लुटत आहेत. मध्यंतरी महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर एका शेतकर्याला लुटले. वयोवृध्दाची योजना लागू झाली आहे आजचा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे तुम्ही 7 हजार रूपये द्या लगेच तुमच्या खात्यावर 40 हजार जमा होतील अशी बतावणी करून शेतकर्याला लुटले होते. या ठिकाणी यापुर्वीही अनेकांना बनवाबनवी करून त्यांच्याकडून पैसे काढून घेतलेले आहेत. त्या परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे पोलिसांनी चेक करून संबंधित चोरट्यांना जेरबंद करायला हवे.








