बीड, (रिपोर्टर) ः यावर्षी उन्हाची तिव्रता अधिक जाणवू लागली. पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होऊ लागले. अख्खा उन्हाळा आणि पाऊस पडेपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागत असते. मराठवाड्यातल्या तलावातील पाण्याचा साठा जेमतेम असला तरी त्यात योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. मध्यम प्रकल्पामधील साठा मात्र कमी झाल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यामधील 75 मध्यम प्रकल्पात फक्त 9.12 टक्के पाण्याचा साठा शिल्लक राहीला आहे. गोदावरी नदीवर 15 बंधारे असून या बंधार्यात 26 टक्के पाण्याचा साठा राहिलेला आहे. बीड जिल्ह्यातील काही तलावानी तळ गाठला तर काही तलावात पाण्याचा साठा शिल्लक राहीला.
मराठवाड्यातील यावर्षी 99 टक्के धरणे भरली होती. पाऊस चांगला झाल्याने खरीपासह रब्बी पिके जोमात आली. बहुतांश शेतकर्यांनी उन्हाळी पिकांची लागवड केली आहे. तलावाशेजारी शेतजमिनींना पाटाव्दारे पाणी सोडले जात आहे. मांजरा, माजलगाव, गोदावरी, सिंदफणा यासह इतर बड्या तलावातून शेतीपिकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. उन्हाची तिव्रता वाढत असल्याने पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होऊ लागले. मराठवाड्यातील मोठ्या धरणात 62 टक्के पाणी शिल्लक आहे. 75 मध्यम प्रकल्पात 9.12 टक्के तर 751 लघु प्रकल्पात 31.80 टक्के पाणी साठा शिल्लक राहिला. गोदावरी नदीवरील 15 बंधार्यात 26.27 टक्के पाण्याचा साठा शिल्लक आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे असलेल्या जायकवाडी धरणात 63 टक्के पाणी आहे. बीड जिल्ह्यातील काही धरणातले पाणी संपले असले तरी इतर धरणामध्ये 40 टक्क्यापर्यंत पाणीसाठा शिल्लक राहीला आहे. माजलगाव, सिंदफणा, मांजरा या बड्या धरणात बर्यापैकी पाणीसाठा शिल्लक आहे. आगामी काळाचा विचार करता प्रशासनाच्यावतीने पाण्याचे नियोजन केले जात असते.








