पैसे कमावण्याचा गोरख धंदा
बीड (रिपोर्टर) सध्या आयटी रिटर्न भरण्याचे दोन दिवस शिल्लक राहिले असल्याने जो तो बँकेत स्टेटमेंट आणण्यासाठी गर्दी करत आहे. त्याचाच फायदा बँक ऑफ महाराष्ट्र घेत असून स्टेटमेंटसाठी अर्ज करणार्या ठेवीदाराला तुम्हाला ईमेलवर स्टेटमेंट मिळणार नाही. प्रिंटच घ्यावी लागेल आणि प्रत्येकी एका प्रिंटसाठी 75 रूपये अकाऊंट मधून कपात होतील असे सांगण्यात येते. ज्यांचे नेट बँकींग नाही त्यांच्यापुढे दुसरा पर्यायच नसल्याने जिथे दोन रूपयात झेरॉक्स मिळते त्याच प्रिंटसाठी बँक तब्बल 75 रूपये घेते.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून ठेवीदारांच्या खात्यावर दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. या बँकेकडून ठेवीदारांना वारंवार पैसे कपात झाल्याचे एसएमएस येत असतात. त्यामध्ये एसएमएस चार्ज असेल, अकाऊंट मेंटेन असेल, एटीएम चार्ज असेल असे एक ना अनेक चार्ज बँक ग्राहकांच्या माथी मारते. आता त्यातच महाराष्ट्र ग्रामीण बँकेने अजब फंडा राबवला आहे. दोन दिवसावर आयटी रिटर्न भरण्याची तारीख असल्याने जो तो बँकेत स्टेटमेंट घेण्यासाठी गर्दी करतो. याच गर्दीचा फायदा येथील बँकेने घेतला की काय? अशी शंका उपलब्ध होत आहे. बाजारात दोन रूपयात मिळणारी एक प्रिंट बँक स्टेटमेंटसाठी तब्बल 75 रूपये आकारत आहे. हे जास्तीचे पैसे नेमके कशाचे आकारले जातात? याची माहिती ठेवीदारांना कोणीही देत नाहीत. शिवाय इन्कम टॅक्स भरण्याची तारीख दोन दिवसावर आल्याने ग्राहक हा भूर्दंड गपगुमान सहन करतो.
स्टेटमेंट घ्यायचे तर घ्या नाहीतर बाजुला सरका
स्टेटमेंट घेण्यासाठी बँकेत सध्या मोठी गर्दी होत आहे. अशावेळी एखाद्या ग्राहकाने एका प्रिंटचे 75 रूपये कशाचे? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर तुम्हाला स्टेटमेंट पाहिजे की नाही? घ्यायचे असेल तर घ्या नाहीतर बाजुला सरका….अजुन दुसर्यांनाही द्यायचे आहे. अगोदरच एक तास भर स्टेटमेंट उभा राहिलेला माणूस गपगुमान पैसे मोजून स्टेटमेंट घेत आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्र बँक ठेवीदारांना तोंड दाबून बुक्याचा मार देत असल्याचे दिसून येत आहे.कर्मचार्यांना शिस्तीच्या धड्याची गरज
महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ठेवीदार हे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील आहेत. यातील काही ठेवीदार हे अशिक्षीतही असतात. त्यामुळे त्यांना बँकेच्या व्यवहाराचे सर्वच ज्ञान नसते. अशावेळी हे ठेवीदार एखादी माहिती येथील कर्मचार्याला विचारतात मात्र हे कर्मचारी आपल्या एवढे तोर्यात असतात की त्याने दहावेळा विचारले तरी त्याच्याकडे पाहत नाहीत. एखाद्याने वारंवार विचारल्यावर त्याच्या अंगावर कुत्र्यासारखे खिसकतात. त्याला अपमानास्पद बोलतात. एखादा काही बोलला तर लगेच सर्वच कर्मचारी त्याच्यावर धावून जातात आणि ‘तुला बँकेचे नियम माहिती का?, मोठ्या आवाजात बोलू नको, शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केल्यावर काय होते माहितेय ना’ असे म्हणत त्या अशिक्षीत आणि वयोवृध्द ठेवीदारांचा अपमान केला जातो. त्यामुळे अशा बँकेतील काही कर्मचार्यांना ग्राहकांशी कसे बोलावे? याचे डोस पाजणे गरजेचे आहे.