बीड, (रिपोर्टर) ः समाजक्रांतीचे जनक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अलोट असा जनसागर लोटला होता. सुरुवातीला भन्ते बौद्ध धम्मशिल यांच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण करत त्रिशरण पंचशिल आणि बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलिस अधिक्षक नवनीत कॉँवत आणि प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संगीतादेवी पाटील, रिपाई प्रदेश युवक अध्यक्ष पप्पू कागदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

दि.4 एप्रिलपासून डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने सामाजिक न्याय भवनाच्या प्रांगणामध्ये विविध विषयावर विचारवंतांची व्याख्यानमाला, नाटक, संगीत, डान्स यासह विविध स्पर्धा या उत्सव समितीच्या वतीने गेल्या आठवडाभर घेण्यात आल्या. रात्री 12 वाजता जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून समता ज्योतफेरी काढण्यात आली. या फेरीची सुरुवात पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून कारंजा, माळीवेस मार्गे प्रभात फेरीही काढण्यात आली. शहरातील विविध बौद्ध विहारातून रथामध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढत बौद्ध उपासक, उपासिका यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. सकाळी 9 वाजता भन्ते धम्मशिल यांच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण करत त्रिशरण पंचशिल आणि बुद्धवंदना घेण्यात आली. अख्खे बीड शहरात बाबासाहेबांचा जयघोष करणारे बॅनर, निळे ध्वज लावण्यात आले होते.

भल्या पहाटेपासूनच बौद्ध समाज भिम अनुयायी मोठ्या उत्साहात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जात होते. सुभाष रोड, माळीवेस भागात या समाजबांधवांना काही स्वयंसेवी संस्थांच्या वतीने अल्पोपहार, थंड पेयाची सोय करण्यात आली. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी गोल्डे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिंदे गट सचिन मुळूक, जयंती उत्सव समितीच्या अरुणाताई आठवले, जयदीप सवई, अशोक हिेंगे, अॅड़. चंद्रकांत नवले, माजी आ. जनार्दन तुपे, हेमंत क्षीरसागर, कॉ. नामदेव चव्हाण, अॅड. महेश धांडे, प्रा. सुशिलाताई मोराळे आदी मान्यवर उपस्थित होते.







