
अवकाळी, वादळी वार्याने 54 हजार हेक्टरमधील शेती पिकाचे नुकसान
राज्य सरकारने दमडीची नुकसान भरपाई दिली नाही
बीड, (रिपोर्टर) ः राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या सुरूच असून दररोज 6 ते 7 शेतकरी मृत्यूला कवटाळतात. गेल्या 4 महिन्यात राज्यातील 1 पेक्षा जास्त शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. चार महिन्याच्या कार्यकाळात अनेकवेळा वादळी वार्यासह पाऊस झाला. निसर्गाच्या लहरीपणाचा 54 हजार 533 हेक्टरमधील पिकांना फटका बसला. इतकं मोठं क्षेत्र बाधित होऊनही राज्य सरकारने मात्र कसलीही नुकसान भरपाई जाहीर केलेली नाही.
राज्यामध्ये शेतकर्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकरी आत्महत्या वाढण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. त्यात प्रामुख्याने कर्जबाजारीपणा, नापिकी, शेतीमालाला योग्य भाव न मिळणे त्याचबरोबर इतरही काही कारणे आहेत. शेतकर्यांना शासन नुसत्याच बाता आणि थापा मारून आलेले आहे. कर्जमाफी करण्याचा निर्णय होईल असं वाटत होतं. मात्र, सरकारने कर्जमाफीची घोषणा केलेलीच नाही. गेल्या 4 महिन्याच्या कार्यकाळात 1 हजारपेक्षा जास्त शेतकर्यांनी मरणाला जवळ केले. 4 महिन्याच्या कार्यकाळात अनेकवेळा निसर्गाचा लहरीपणा समोर आला. वादळीवार्यासह गारपीट, पाऊस पडल्याने 54 हजार 533 हेक्टरमधील पिकांमध्ये नुकसान झालेले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना अद्यापही शासनाने कुठलीही मदत जाहीर केलेली नाही.






