
मराठवाड्यात 4 महिन्यात सर्वाधिक 269 आत्महत्या
एकट्या बीड जिल्ह्यात 71 शेतकर्यांनी मृत्युला कवटाळले
बीड (रिपोर्टर): 2025 च्या अवघ्या चार महिन्यात राज्यामध्ये सुमारे 1 हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाल्यानंतर फडणवीस सरकार खडबडून जागे झाले. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या वारश्यांना सरकारने 20 कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांगण्यात येत असून गेल्या चार महिन्यांच्या कालखंडात बीड जिल्ह्यात 71, संभाजीनगरमध्ये 50, हिंगोली 37, परभणी 33, धाराशीव 31, लातूर 18 तर जालन्यामध्ये 13 शेतकर्यांनी अतामहत्या केल्या होत्या. सदरची आकडेवारी ही 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 या कालावधीतील असून मराठवाड्यात 269 शेतकर्यांनी या चार महिन्यांमध्ये आत्महत्या केल्या.
आत्महत्यासारख्या गंभीर घटनांबाबत बोलताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील म्हणाले, नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतपेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांमुळे शेतकर्यांच्या आत्महत्या होतात. या तिन कारणांमुळे आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या वारसांना शासनाकडून मदत दिली जाते, परंतु त्यापूर्वी महसूल, कृषी, गृह व सहकार विभागामार्फत तपासणी केली जाते. राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेला निधी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळता राज्यातील उर्वरित जिल्हाधिकार्यांना विभागीय आयुक्तांमार्फत वितरीत करण्यात येणार आहे. सरकारकडे निधी कमी असला तरी शेतकर्यांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यात येणार आहे.
विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना 13819 कोटींची मदत अद्याप येणे बाकी आहे. 2025 च्या चालू चार महिन्यात राज्यामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल 54 हजार 533 हेक्टर क्षेत्र बाधीत झाल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला. त्यातून राज्यात 1 हजारपेक्षा अधिक शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. प्रामुख्याने मराठवाड्यात हा आकडा जास्तीचा असून चार महिन्यात 269 शेतकर्यांच्या आत्महत्या घडल्या. त्याअनुषंगाने शेतकर्यांच्या कुटुंबियांना अर्थिक मदत दिली जाणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांनी म्हटले.






