
माकपचे पंचायत समितीसमोर बेमुदत धरणे
परळी वैजनाथ (रिपोर्टर): परळी तालुक्यातील मोहा येथील ग्रामस्थांच्या मोदी आवास योजनेतील घरकुलांचे अनुदान ग्रामपंचायतने पाठपुरावा करुनही गत दोन वर्षापासुन रखडलेले आहे.हे अनुदान त्वरीत द्यावे यासाठी माकपच्या वतीने परळी पंचायत समिती कार्यालयासमोर ड.अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि.16 जुनपासुन बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहेत.
परळी तालुक्यातील मोहा गावातील ग्रामस्थांना घरकुल मंजुरीसाठी ग्रामस्थ दि.29 मे 2024 पासुन पाठपुरावा करत असतानाही अद्याप या लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता मिळालेला नाही.शासनाकडुन घरकल देण्याची मोहीम राबविली जात असतानाही मोहा गावातील पात्र लाभार्थी लाभापासून वंचित आहेत.
सोमवार दि.16 जुनपासुन माकपच्या वतीने कॉ.अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली प्रविण देशमुख,मदन वाघमारे,कॉ.सुदाम शिंदे,कॉ.शिवाजी पांचाळ,लक्ष्मण कोकाटे, धर्मराज कोकाटे,जगन्नाथ राजमाने,अशोक राजमाने, गोविंद शिंदे आदी ग्रामस्थ पंचायत समितीसमोर बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत.ग्रामपंचायत मोहा येथील मोदी आवास योजनेतील घरकुलांचा पहिला हप्ता मिळावा,ओबीसी कोट्यातील पात्र लाभार्थ्यांना डावलुन बोगस लाभार्थ्यांची नावे दिली त्याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी व योग्य लाभार्थ्यांना लाभ द्यवा या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे कॉ.अजय बुरांडे यांनी सांगितले.









