
पत्नीचे तोंड दाबून दागिने ओरबाडले, पतीचे धारदार शस्त्राने डोके फोडले
आधी शेजार्यांच्या घराच्या कड्या लावल्या नंतर तुपेंच्या घराचे दार तोडले
नगदी पाच हजार रुपयांसह एक लाख 66 हजारांचा ऐवज लंपास
परिसरात दहशत
शिरूर (रिपोर्टर): गुन्हेगारी घटनांनी सातत्याने चर्चेत राहिलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एक थरारक घटना समोर आली आहे. काल मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास अज्ञात तीन दरोडेखोरांनी एका घराचे दार तोडून घरामध्ये प्रवेश करत झोपलेल्या महिलेचे तोंड दाबत तिच्या अंगावरचे दागिने ओरबाडून घेतले. या दरम्यान पती जागा झाला असता त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केला. दरोडेखोरांनी या वेळी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी पाच हजार रुपये रोकड असा एकूण 1 लाख 66 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरोडा टाकण्या वेळी दरोडेखोरांनी आजुबाजुच्या घराच्या बाहेरून कड्या लावल्या. या दरोड्याने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील जखमीस अहिल्यानगरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह श्वान पथक, फिंगर प्रिंट पथक डेरेदाखल झाल्याचे सांगण्यात येते. सदरची घटना शिरूर तालुक्यातील मानूर जवळ असलेल्या हनुमान वाडी येथील तुपे वस्तीवर घडली.

याबाबत अधिक असे की, शिरूर तालुक्यातील मानूरजवळ असलेल्या हनुमानवाडी येथील तुपे वस्तीवर भगवान तुपे व त्यांच्या पत्नी सरस्वती तुपे हे दाम्पत्य गेल्या कित्येक वर्षांपासून राहतात. रात्री त्यांनी जेवण केले आणि झोपी गेले. मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास तोंड बांधलेले तीन दरोडेखोर त्या वस्तीवर आले. सर्वप्रथम दरोडेखोरांनी वस्तीवरील अन्य घरांच्या कड्या बाहेरून लावल्या त्यानंतर भगवान तुपे यांच्या घराकडे मोर्चा वळवत त्यांच्या घराचे दार तोडून आतमध्ये प्रवेश केला. भगवान तुपे यांच्या पत्नी सरस्वती ज्या ठिकाणी झोपलेल्या होत्या त्या ठिकाणी जात त्यांचे तोंड दाबत गळ्यातील मंगळसुत्र त्यांनी ओरबाडून घेतले. त्याचबरोबर बाजुला झोपलेले भगवान तुपे हे जागे झाले त्या वेळी त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. दरोडेखोरांनी सरस्वती तुपे यांच्या पाकिटातील रोख 5 हजार रुपये, गळ्यातील तसेच घरात ठेवलेले दोन तोळ्याचे दागिने घेऊन दरोडेखोर पसार झाले. जखमी भगवान तुपे यांना अहिल्यानगर येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदरची घटना दहशत माजवणारी असल्याने या परिसरात या दरोड्याच्या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती कळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घयनास्थळी डेरेदाखल झाल्याचे सांगण्यात येत असून श्वान पथकासह फिंगर प्रिंट पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
0000








