
गेवराई तालुक्यात 80 हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण ; शेतकरी हवालदिल, उगवलेली पिके सुकू लागली
भागवत जाधव । गेवराई
गेवराई – यावर्षी मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या समाधानकारक अवकाळी पावसाने शेतकर्यांना खरीप हंगामासाठी आशेची नवी पालवी फुलवली होती. कापूस, तुर, बाजरी, सोयाबीन आदी पिकांच्या 80 हजार हेक्टर क्षेत्रावर वेळेत पेरण्या पार पडल्या. पिके चांगली उगवून ताशी लागली, मात्र पावसाने मागील 15 दिवसांपासून पाठ फिरवल्याने हवालदिल झालेले शेतकरी आता दुबार पेरणीच्या उंबरठ्यावर उभे आहेत.
पावसाच्या दडीमुळे उगवलेली पिके सुकत आहेत, जमिनीतील उरलेली ओलाही आता संपत आली आहे. दुपारी वाढलेले तापमान, रात्री कोरडे हवामान आणि चांदणं पडणं या वातावरणाने जमिनीतला दम काढला आहे. पाच ते सहा दिवसांत पाऊस न झाल्यास शेतकर्यांना पुन्हा एकदा बँक, पतसंस्था व सावकारांचे उंबरठे झिजवत दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील सर्वाधिक पेरा कापसावर – 63,425 हेक्टरवर झाला असून, त्याखालोखाल तुर (6,841), सोयाबीन (3,500), बाजरी, भुईमूग, मका, उडीद व तीळ यांची पेरणीही झाली आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच बी-बियाणे, खते, औषधांवर मोठा खर्च झाला असून, आता पुन्हा त्याच गोष्टींसाठी खर्च करावा लागल्यास शेतकर्यांची आर्थिक कोंडी होणार हे निश्चित आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता प्रशासन व कृषी विभागाने तातडीने शेतकर्यांसाठी मदतीचे धोरण ठरवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शेतकर्यांचे वास्तव
यावर्षी लवकर पाऊस पडला त्यामुळे पावसावर विश्वास ठेवून आत्मविश्वासाने पेरण्या केल्या. आता गेल्या पंधरा दिवसापासून पाऊस गायब झाला असून रोपे सुकत आहेत. परत दुबार पेरणीसाठी बी-बियाणं घ्यायचं तर पैसे कुठून आणायचे? असा प्रश्न पडला आहे.
– उद्धव पवार, शेतकरी, गेवराई तालुका











