बीड (रिपोर्टर) : स्थानिक गुन्हे शाखेने सिरसदेवी (ता. गेवराई) येथे अंमली पदार्थ विक्रेत्यावर छापा टाकत मोठी कारवाई केली असून, तब्बल ८ किलो ८८८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड (स्थानिक गुन्हे शाखा, बीड) यांना २० एप्रिल २०२६ रोजी गुप्त माहिती मिळाली की, सिरसदेवी गावात एक इसम गांजा बाळगून त्याची चोरटी विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले.
पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार आनंद मस्के, विकास राठोड, राहुल शिंदे, अंकुश वरपे, बबन सलगर, अतुल हराळे तसेच तलवडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे कारवाई करत सिरसदेवी येथील शेख रईस शेख युसूफ (वय २५, रा. सिरसदेवी) याच्या राहत्या घरी छापा टाकला. यावेळी त्याच्या घरातून बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ठेवलेला ८ किलो ८८८ ग्रॅम वजनाचा, अंदाजे २ लाख ६६ हजार ६४० रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी तलवडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२०/२०२६ नोंदवून अंमली पदार्थ कायद्यांतर्गत कलम ८(क) व २०(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अंमली पदार्थांविरोधातील पोलिसांची कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.








