गेवराई (बीड) : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर गेवराई पोलिसांनी मोठी कारवाई करत वाळूने भरलेला हायवा पकडून तब्बल 20 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या सूचनेनुसार आणि अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने गेवराई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार दि. 3 मे 2026 रोजी पहाटे सुमारे 3.50 वाजता गेवराई बायपास रोडवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर दत्तराज पार्क कमानीजवळ पेट्रोलिंग दरम्यान वाळूने भरलेला संशयित हायवा आढळून आला.
पोलिसांनी तात्काळ वाहन थांबवून तपासणी केली असता संबंधित हायवा अवैध वाळू वाहतूक करत असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी हायवा क्रमांक AP39TQ1239 चा चालक सय्यद शाकेर सय्यद हसन (वय 46, रा. लिंबागणेश, जि. बीड) याला वाहनासह ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत हायवा व अंदाजे 6 ब्रास वाळूसह एकूण 20,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 270/2026, कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या पथकाने केली. कारवाईत पोलीस कर्मचारी नितीन शिंदे, कल्याण राठोड, गोरक्ष डोके व जितेंद्र ओव्हाळ यांनी सहभाग घेतला.










