
30 जुलैपर्यंत 10 हजार झाडांची लागवड करणार -सयाजी शिंदे, अरविंद जगताप
बीड (रिपोर्टर): वृक्ष आणि झाडेझुडपे असतील तरच मानवी जीवन सुकर होईल. स्वच्छ ऑक्सिजन मिळेल. आधुनिक युगात शुद्ध हवा मिळणे मानवाला कठीण झाले आहे. त्यामुळे गेल्या सात वर्षांपूर्वी पालवणच्या डोंगर आणि गायरान जमीनीत पाच हजार झाडे लावून देवराई निर्माण केली आहे तसेच नामलगाव फाट्यानजीक रामगड या ठिकाणी 10 हजार झाडांची लागवड 30 जुलैपर्यंत करण्यात येणार आहे. चित्रपट कथाकार अरविंद जगताप यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त 75 झाडे लावून याची सुरुवात केली आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.
बीड येथे आयोजीत पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. या वेळी चित्रपट कथाकार अरविंद जगताप, डॉक्टर असोसिएशनचे शेळके, कृषीभूषण शिवराम घोडके आदी उपस्थित होते. वातावरणामध्ये कार्बनडाय ऑक्साईड मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शुद्ध हवा मिळण्यासाठी झाडांचे अस्तित्व महत्वाचे आहे. ही बाब ध्यानी घेऊन यावर्षी नामलगाव फाट्यानजीक रामगड या ठिकाणी 65 एकर गायरान जमीनीमध्ये विविध वनस्पतींची, िंंचंच, वड, पिंपळ आदी प्रकाराची झाडे लावून यामध्येच फुलपाखरांसाठीचे स्वतंत्र हजार फुल झाडांची लागवड करण्यात येणार आहे. समाजातील डॉक्टर, प्राध्यापक व प्रतिष्ठीत व्यक्तींनी या ठिकाणी आपल्या आई वडिलांच्या वाढदिवसानिमित्त झाडे लावून सहभाग नोंदवावा, असेही आवाहन प्रसिद्ध सिनेअभिनेता सयाजी शिंदे आणि अरविंद जगताप यांनी केले. ही झाडे लावण्यासोबतच झाडे टिकतील कसे? याकडेही आम्हीपण लक्ष देऊ आणि समाजातील नागरिकांनी पण लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.







