
29 ऑगस्टला मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार
मराठ्यांचा नाद करू नका, आता माघार नाही, जरांगेंचा इशारा
भागवत जाधव । अंतरवली सराटी

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसह समाजाच्या अन्य मागण्यांसाठी 29 ऑगस्ट रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईनगरीवर मोर्चा धडकणार आहे. त्याअनुषंगाने बोलवण्यात आलेल्या अंतरवली सराटी येथील आजच्या बैठकीला मोठा प्रतिसाद मिळाला असून अंतरवलीत पुन्हा एकदा मराठ्यांचा जनसागर उसळला आहे.या वेळी मार्ग बदलून मुंबईमध्ये धडकणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता मराठ्यांचा नाद करायचा नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आता मराठा आणि कुणबी एकच हा जीआर घेतल्याशिवाय मुंबईतून माघार नाही, असा निश्चय या बैठकीत करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा मराठ्यांचं वादळ मुंबई महानगरीत जावून धडकणार आहे. 29 ऑगस्ट रोजी हे आंदोलन होत असून त्याअनुषंगाने आज अंतरवली सराटी याठिकाणी मराठ्यांची महत्वपुर्ण बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अंतरवलीत मराठ्यांचा जनसागर उसळल्याचे चित्र पहावयास मिळाले. एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी आस्मंत दुमदुमून गेले. आता माघार नाही, मराठा आणि कुणबी एकच हा जीआर घेतल्याशिवाय मुंबईतून बाहेर निघणार नसल्याचे सांगत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुक्यमंत्री फडणविसांनी मराठ्यांचा नाद करू नये, असा इशारा देत शिंदे समितीने दिलेल्या 58 लाख नोंदींचा अहवाल दिला. सरकारने सांगितले होते आधार पाहिजे.
तो आधार या नोंदीतून देण्यात आला. मात्र अद्याप मराठा समाजाला कुणबी समाजामध्ये सामावून घेतले नाही. हैदराबाद आणि मुंबई गॅझेट लागू करण्याची मागणी या आंदोलनात असणार असून मराठा समाजावर आंदोलनादरम्यान सरकारने ज्या काही केसेस केलेल्या आहेत त्या मागे घेतल्याशिवाय आता आंदोलन मागे घेणार नाही, मागे हटणार नाही, असे जरांगे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी समाजातल्या ज्या तरुणांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये व नोकरी द्या, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. 29 ऑगस्ट रोजी मुंबई महानगरीवर हा जाणार आहे. त्याअनुषंगाने आयोजीत बैठकीत मोठ्या संख्येने मराठ्यांची उपस्थिती आजच सरकारच्या उरात धडकी भरवणारी दिसून आली.
फडणवीस साहेब, माझ्या समाजाला द्या
आता शांतीत क्रांती करून दाखवणार -जरांगे
मुख्यमंत्री फडणवीस साहेब, जरांगेला संपवले म्हणताय, तर आजचं अंतरवलीतलं हे वादळ डोळे फाडून पहा, मराठा समाज कालही एकत्र होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या नादी लागू नका, शेवटचं सांगतो, मला काही नको, माझ्या समाजाला न्याय पाहिजे, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्हाला जे कोणी विरोध करतय त्यांना आता मी उत्तर देणार नाही. काही नाही बोलता आता शांतीत क्रांती करून दाखवेल. माझ्या समाजाला व मला आडमुठे ठरू नये म्हणून मी राज्यातले तीन जण नेते सोडून सर्व आमदारांना फोन केले आहेत. 288 आमदारांना सांगितलं, तुम्ही सर्व मिळून फडणवीस यांच्याकडे जा, त्यांना सांगा, कुणबी अन् मराठा एकच आहे. हैदराबाद, मुंबई गॅझेट व आमच्या सर्व मागण्या मान्य करा, ही अमलबजावणी झाली तर मी 29 ऑगस्टला अंतरवली सोडील आणि नाही झाली तर मी मुंबईत येणारच. पुढची जबाबदारी ही तुमची. अजून त्यांच्याकडे दोन महिने आहेत, काय होतय ते पाहू आणि 29 ऑगस्टला मात्र मराठ्यांनी सज्ज राहायचं आहे. असे जरांगे पाटील म्हणाले. मला माझा समाज प्रिय आहे, मला कोणाचेही देणेघेणे नाही. मला समाजाला मोठं करायचय, असंही जरांगे म्हणाले.






