प्रकरणे 9 हजार
भुमापक 2, तातडीच्या मोजणीला लागतात आठ महिने
बीड, (रिपोर्टर)ः- येत्या मार्च महिन्यापासून ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्ताव घेणे बंद केले आहे. तब्बल दोन वर्षे ही गुंठेवारीचे प्रस्ताव घेणे बंद असतांना कसे तरी गेल्या वर्षेभरापुर्वी पाच महिन्यापासून हे प्रस्ताव घेण्यास सुरूवात झाली. मात्र पाच महिन्यानंतर मार्च महिना आला की पुन्हा हे प्रस्ताव बंद झाले. त्यामुळे ग्रामीण भागातील जवळपास 9 हजार गुंठेवारीचे प्रस्ताव तालुका भुमि अभिलेख कार्यालयात मोजणीसाठी दाखल झाले आहेत. मात्र याच्या मोजणीसाठी केवळ दोनच भुपामक असुन येथील तालुका भुमि अभिलेख अधिकारी गेल्या वर्षेभरापासून प्रभारी प्रभारी अशा प्रकारे हा पदभार संगीत खुर्ची सारखा फिरतो आहे.
ग्रामीण भागातील गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रेचे व्यवहार गुंठेवारीमुळे ठप्प झाले आहेत. तब्बल दोन वर्षाच्या कालखंडानंतर राज्य सरकाने बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागाची गुंठेवारी सुरू केली. दोन वर्षानंतर ही गुंठेवारी प्रक्रिया सुरू झाल्यामुळे जवळपास नऊ हजार गुंठेवारीचे प्रकरणे उपविभागीय अधिकार्याकडे दाखल करण्यात आली. त्यांनी मोजणीसाठी तालुका भुमि अभिलेख कार्यालय यांच्याकडे पाठवले. दोन वर्षापासून बंद असल्याने आपली गुंठेवारी लवकर व्हावी यामुळे 12 हजार मोजणीचे चलन तातडीने लोकांनी भरले. हे 12 हजार चलन भरल्यानंतर एक महिन्याच्या आत संबंधिताची जागा मोजून नकाशा काढून देणे बंधनकारक असतांना तब्बल 8-8 महिने ही मोजणी होतच नाही.
या बाबत वारंवार अध्यक्ष भुमि अभिलेख शिंदे यांना विचारणा केली असता खाजगी मोजणीदारांचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे. मंजूरी मिळाल्यानंतर तातडीने मोजणी करून नकाशा उपलब्ध करू देवू असे फक्त सहा महिन्यापासून सांगतात. मात्र अंमलबजावणी काही नाही. तालुका भुमि अभिलेख याचा पदभार शिवणकर नावाच्या अधिकार्याकडे होता. मात्र तब्बल ते तीन महिन्यापासून सुट्टीवर असल्याने आष्टी, परळी येथील गिडबने अधिकार्याकडे हा पदभार देण्यात आला. ते अधिकारी कधीही कार्यालयात उपलब्ध झाले नाहीत. या कार्यालयात हजारोंच्या संख्येने लोक चक्रा मारतात. मात्र दोनच मोजणीदार असल्याने ते धड उत्तरही देत नाहीत आणि मोजणीची प्रक्रियाही होत नाही म्हणून जिल्हाधिकार्यांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी आणि अडलेल्या लोकांची गुंठेवारीची प्रकरणी निकाली काढावे अशी मागणी होत आहे.






