
हे सरकार शेतकरी विरोधी -पटोले
लातूर येथील शेतकरी दाम्पत्याचा व्हिडीओ व्हायरल
विधीमंडळात उमटले पडसाद
मुंबई (रिपोर्टर): लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील 70 वर्षीय वयोवृद्ध शेतकरी बैल नसल्याने स्वत:च जुंपून घेत कोळपणी करत असल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. हा व्हिडिओ काळीज पिळवून टाकणारा असून याचे पडसाद आज विधीमंडळामध्ये उमटले. विरोधकांनी शेतकर्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला. सरकारला शेतकर्यांशी कुठलेही देणेघेणे नसून सरकार फक्त इव्हेंटबाज असल्याचा घणाघात काँग्रेसचे नाना पटोले यांनी केला आहे.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून सुरुवातीलाच विरोधक शेतकर्यांच्या प्रश्नावर आक्रमक दिसून आले. लातूर जिल्ह्यातील हडोळती गावच्या शेतकरी दाम्पत्याचा एक व्हिडिओ काल सर्वत्र व्हायरल झाला. बैल घेण्यासाठी व मजूर लावण्यासाठी पैसे नसल्याने हे शेतकरी वयोवृद्ध दाम्पत्य स्वत: कोळपणी करत आहेत. यासंदर्भात विरोधकांनी आज सत्ताधार्यांना धारेवर धरले. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला. गेल्या तीन महिन्यांमध्ये राज्यात 767 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या असून सरकार फक्त इव्हेंटबाज असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. मोदी तुमचा बाप असेल, शेतकर्यांचा नाही, हे मी हजार वेळा बोलेल, अशी आक्रमक भूमिकाही पटोले यांनी घेतली. नाना पटोले, भास्कर जाधव यांनी आज शेतकर्यांच्या बाबतीत सरकारला चांगलेच सुनावले आहे.








