
रात्रीतून स्मशानभूमी परिसरात पत्र्याचे शेड, कमानीवर स्मशानभूमीचे नाव पुसले, स्मशानभूमी विरुद्ध मंदिर, वाद लावण्याचा प्रयत्न
स्मशानभूमी हाडपण्याचा प्रयत्न करणार्या दोषींवर कारवाई करा
बीड (रिपोर्टर): बीडमध्ये केव्हा काय होईल, गुन्ह्याचं स्वरुप कसं असेल, भ्रष्टाचाराला शिष्टाचाराचे स्वरुप कसे दिले जाईल, जमीनी हाडपताना कुठल्या क्लृपत्या काढल्या जातील हे सांगणे कठीण आहे. माजी आ. सुनील धांडे यांच्या कार्यकाळात उभारलेली हिंदू स्मशानभूमी आणि तिची जागा हाडपण्याचा डाव आता आखला जात असल्याचे निदर्शनास येत असून रात्रीतून हिंदू स्मशानभूमीच्या जागेत पत्र्याचे शेड उभारण्यात आले. त्याचबरोबर हिंदू स्मशानभूमीची जी कमान होती त्या कमानीवर हिंदू स्मशानभूमीचे नाव पुसून श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर असे टाकण्यात आले आहे. मंदिराच्या आडून स्मशानभूमी आणि तिची जागा घश्यात घालण्याचा घाट नेमका कोण घालतोय? याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे, स्मशानभूमी आणि मंदिर हे उभारून जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र कोणाचे? हे जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी तपासावे, अशी मागरी आता सर्वस्तरातून होत आहे.

बीड जिल्हा विविध दुष्कर्माने राज्याच्या कानाकोपर्यात चर्चीला गेला आहे. दुष्कर्म करणारे हे सर्वसामान्य नव्हे तर राजकीय हस्तक असल्याचे वेगवेगळ्या घटनाक्रमावरून दिसून आले आहे. इथला सर्वसामान्य माणूस शांतताप्रिय, विकासाभिमुख आहे. परंतु राजकीय झालर असलेले काही तथाकथीत बीडमध्ये वेगवेगळ्या दुष्कर्मांना आणि भ्रष्टाचाराला अंजाम देताना दिसून येतात. पंधरा ते वीस वर्षांपुर्वी बिंदुसरा नदी पात्राच्या पश्चिमेस माजी आ. प्रा. सुनील धांडे यांनी मोठ्या प्रयत्नांनी हिंदुस्मशानभूमी उभारली होती. आजही ती अत्यंत चांगल्या स्थितीत मोंढ्याकडे जाताना दिसून येते. मात्र रात्रीतून या स्मशानभूमीच्या परिसरामध्ये एक पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. त्यापेक्षाही अधिक खळबळजनक स्मशानभूमीची जी कमान गेल्या पंधरा वर्षांपासून उभी होती त्या स्मशानभूमीच्या कमानीवर स्मशानभूमीचे नाव पुसून त्याठिकाणी संत शिरोमणी सावता महाराज मंदिगर, बीड असे नाव टाकण्यात आले आहे. बीडमध्ये भूमाफिया जमीन हाडपण्यासाठी अनेक वेळा शंभर – दीडशे फुटात मंदिर उभारण्याचे काम करून हजारो फुट जमीन हाडपताना दिसून आले आहेत. इथेही हिंदू स्मशानभूमीची जागा हाडपण्याचा हेतू स्पष्टपणे दिसून येत आहे. स्मशानभूमीच्या कमानीवरील नाव बदलणे, रात्रीतून शेड उभारणे, स्मशानभूमी विरुद्ध मंदिर हा नवा वाद निर्माण करणे नेमके कोणाचे कटकारस्थान या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी लक्ष द्यावे व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.





