अखेर मीरारोडमध्ये प्रचंड संख्येत मोर्चा निघाला
मुंबई, (रिपोर्टर)ः- परप्रांतीय व्यापार्यांनी काढलेल्या मोर्चाविरोधात मराठी भाषिकांकडून मीरारोडमध्ये मोर्चाची हाक देण्यात आली. या मोर्चात मनसे, उद्धवसेना, मराठी एकीकरण समितीसह विविध मराठी भाषिक संघटना रस्त्यावर उतरणार होत्या. मात्र या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. त्याशिवाय मोर्चाचे नेतृत्व करणार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेकांना नोटीस बजावल्या होत्या. 10 वाजता मोर्चा स्थळी कार्यकर्ते जमू लागले तेव्हा पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू झाली. त्यातूनच मीरारोडमध्ये संघर्ष वाढला. या सर्व विरोधाला झुगारून मराठी माणसांनी मोठ्या संख्येने मोर्चाला हजेरी लावली आणि मोर्चाला सुरूवात झाली.
या मोर्चावेळी आंदोलकांनी मराठीचा जयघोष करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी कितीही अडवले तरी मोर्चा होणारच असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. पोलिसांनी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला परंतु मोर्चातील लोकांच्या संख्येमुळे त्यांना अडवणे अशक्य झाले. या मोर्चात मनसे, उद्धवसेना, मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते यांनी हजेरी लावली. डोक्यावर पांढरी गांधी टोपी आणि हातात शिवरायांचा भगवा झेंडा घेऊन मोर्चेकरी त्यांनी ठरवलेल्या मार्गावरून मोर्चात चालत होते. या मोर्चात आलेले मनसे नेते अभिजीत पानसे म्हणाले की, आम्हाला मराठी माणसांचा अभिमान आहे. आज या मोर्चात प्रत्येक मराठी माणसाने हजेरी लावली. पोलिसांनी नेत्यांना अटक केली. दडपशाही करण्यात आली. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले गेले तरीही मराठी माणूस एकवटला. फक्त मीरारोड नव्हे तर राज्यातून जेव्हा मराठी माणसे इथे यायला सुरूवात झाली तेव्हा सरकार घाबरले. मराठी माणसांची एकजूट यापुढे अशीच कायम राहील असं त्यांनी म्हटलं.








