कॉलेजसह शहरातील सर्व शाळांचा सहभाग; घोषणांनी शहर दणाणले
गेवराई (रिपोर्टर) भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने भारतीय जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारक, शहीद, विविध घटना यांचे स्मरण करून त्या संबंधिची स्फूर्ती व कृतज्ञता जागृत राहावी यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आझादी का अमृत मोहत्सव हा उपक्रम राबवून संपूर्ण देशात हरघर तिरंगा हा उपक्रम केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे राबविण्यात येत आसून याच धर्तीवर आज गेवराई प्रशासनाच्या वतीने शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. यामध्ये शहरातील र.भ. अट्टल महाविद्यालयासह सर्व शाळांनी सहभाग नोंदवला होता. दरम्यान या रॅलीच्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते.
स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव निमित्त आयोजित या रॅलीत शंभर विद्यार्थ्यांच्या हाती तीन फूट रूंद व 75 फूट लांबीचा तिरंगा ध्वज देण्यात आला होता तर या रॅलीत पाच हजार विद्यार्थी व दोनशे शिक्षक सहभागी झाले होते. सकाळी 7:00 वाजता शारदा विद्यामंदिर , गेवराई येथून ही भव्य रॅलीचा आरंभ होवून गेवराई शहरातील सर्व भागातून जाणार आहे. शहरातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थी या फेरी दरम्यान लेझीम पथक, टिपरी पथक, झांज पथक, पथनाट्यासह विविध प्रकारच्या कवायती सादर करणार आहेत. या फेरीचा समारोप र.भ. अट्टल महाविद्यालयाच्या मैदानावर समारोप करण्यात आला. ही तिरंगा रॅली यशस्वी करण्यासाठी तहसिलदार खाडे गटविकास अधिकारी डॉ. सचिन सानप, गटशिक्षणाधिकारी पंडित गोपाळघरे परिश्रम घेतले. या रॅलीत शालेय विद्यार्थ्यांसह डॉक्टर, वकील, पत्रकार यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग होता.