राजाभाऊ मुंडे, बाबरी मुंडेंनी घेतली अजितदादांची भेट
पुढील आठवड्यात दादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रवेश
वडवणी (रिपोर्टर):- राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथींना सुरुवात झाल्याचे दिसून येत असून आज स्व. मुंडेंसह पंकजा मुंडे यांचे खंदेसमर्थक म्हणून ओळखले जाणारे राजाभाऊ मुंडे व त्यांचे पुत्र बाबरी मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईतील देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे वृत्त असून पुढील आठवड्यात अजित पवारांच्या उपस्थितीत वडवणीत मुंडे पिता-पुत्रांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. अजित पवारांच्या सोबत झालेल्या बैठकीत आ. प्रकाश सोळंकेंसह युवानेते जयसिंह सोळंके हे उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातला माजलगाव विधानसभा मतदारसंघ हा माजलगाव, वडवणी, धारूर तालुक्यांतील गावांचा समावेश असलेला मतदारसंघ आहे. मुंडेंच्या कार्यकाळात याठिकाणी भाजपाचे आर.टी. देशमुख यांना विजय मिळवता आला होता. मात्र त्यानंतर या मतदारसंघावर कायम प्रकाश सोळंके यांचा वरचष्मा असल्याचे दिसून आले आहे. या मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक आणि पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात काम करत आलेले राजाभाऊ मुंडेंसह बाबरी मुंडे यांचा या भागात दांडगा जनसंपर्क आहे. भाजपासाठी मुंडे पिता-पुत्रांनी गेली कित्येक वर्षे काम केलेले आहे मात्र आता हे मुंडे पिता-पुत्र भाजप सोडत असून आज राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांनी उपमुक्णयमंत्री अजित पवार यांची मुंबईतील देवगिरी बंगल्यावर भेट घेतली. या वेळी प्रवेशाबाबत चर्चा झाली. या बैठकीला आ. प्रकाश सोळंके, युवानेते जयसिंह सोळंके हे उपस्थित होते. मुंडे पिता-पुत्रांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद अधिक बळकट होणार आहे. पुढील आठवड्यात अजित पवारांच्या उपस्थितीत वडवणी येथे मुंडे पिता-पुत्रांचा प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येते.








