
रिक्षाचालक ठार; रिक्षामधील प्रवाशी जखमी
अपघातानंतर संतप्त नागरिकांची बसवर दगडफेक
परळी (रिपोर्टर): बीडहून नांदेडकडे निघालेल्या शिवशाही एसटी बसने मजूर घेऊन निघालेल्या रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघताात रिक्षाचालक जागीच ठार झाला. ही घटना पांगरी तांडा येथे आज सकाळी दहा वाजता घडली. अपघातानंतर तेथील संतप्त नागरिकांनी बसवर दगडफेक करून बसची तोडफोड केली. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बीडहून परळीमार्गे नांदेडकडे निघालेली शिवशाही बस (क्र. एम.एच. 09 एफ.एल. 0988) ने पांगरी फाट्याजवळ ऑटोरिक्षाला जोराची धडक दिली. यामध्ये ऑटोरिक्षा चालक श्रीनिवास शिवा राठोड (वय 22 वर्षे, रा. पांगरी तांडा) हा ठार झाला तर रिक्षामधील महिला मजूर जखमी झाल्या. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात झाल्याची माहिती पांगरी तांडा येथील नागरिकांना झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी एसटी बसवर दगडफेक करत बसचे नुकसान केले. घटनेची माहिती परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांना झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.









