तान्ह्या बाळाला घरात ठेवले
विरह सहन न झाल्याने उचलले टोकाचे पाऊल
बीड, (रिपोर्टर)ः- गेल्या चार ते पास दिवसापुर्वी पतीने पुणे येथे गळफास घेवून आत्महत्या केल्याने विरह सहन न झालेल्या पत्नीने आपले जिवन संपविल्याची घटना आष्टी तालुक्यातील खिळद येथे घडली. सदरील विवाहितेने आपल्या ताहन्या बाळाला घरी सोडून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या बाबत अधिक असे की, पाटोदा तालुक्यातील घुगेवाडी येथील नंदू नागरगोजे यांचा विवाह गेल्या वर्षेभरापुर्वी आष्टी तालुक्यातील खिळद येथील स्वाती गर्जे यांच्या सोबत झाला होता. हे दोघेही पुणे येथील शेवाळवाडी येथे राहत होते. स्वाती गर्भवती असल्याने तीन महिन्यापुर्वी ती तिच्या आई वडीलांकडे बाळांतपणासाठी आली होती. चार दिवसापुर्वी स्वातीच्या पती नंदू नागरगोजे यांनी पुण्यातील त्यांच्या भाड्याच्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. पतीचा अंतविधी आणि सावडण्याचा कार्यक्रम आटपून हे कुटूंब खिळद या गावी परतले. पतीच्या आत्महत्येने व्याकूळ झालेल्या आणि विरह सहन न झाल्याने स्वातीने आपल्या ताहन्या बाळाला घरात सोडून घरापासून जवळ असलेल्या एका विहिरीत उडू घेवून आत्महत्या केली. या घटनेची माहिती अंभोरा पोलीस ठाण्याचे पो.नि. नामदेव सातव, पो.अ.शिवदास केदार आणि कृष्णा लव्हारे यांना झाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह बाहेर काढत धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेने त्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.






