मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या अंतिम इशारा बैठकीला मोठी गर्दी
अंतरवली सराटीतून जरांगेंची बैठकीकडे कूच; रस्त्यात ठिकठिकाणी जंगी स्वागत
जरांगे सरकारला काय इशारा देणार
बीड/मांजरसुंबा (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात 29 ऑगस्ट रोजी मुंबई महानगरीत मराठ्यांचा मोर्चा निघणार आहे. त्या अनुषंगाने आज अंतिम इशारा बैठक जरांगे यांनी बीड नजीकच्या मांजरसुंबा येथे आयोजीत केली आहे. या बैठकीला जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मराठा समाज उपस्थित राहत असून बैठकीअगोदर मांजरसुंब्यात मराठ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दी पहावयास मिळत आहे. या बैठकीतून मनोज जरांगे पाटील राज्य सरकारला काय इशारा देतात याकडे उभ्या राज्याचे लक्ष लागून आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे त्याचबरोबर आरक्षणात सग्यासोयर्यांना समाविष्ट करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबई महानगरीकडे कूच करणार आहेत. त्याअनुषंगाने गेल्या महिनाभराच्या कालखंडात उभा महाराष्ट्र जरांगे पाटील यांनी पिंजून काढलेला आहे. अवघ्या चार दिवसांवर 29 तारीख येऊन ठेपली असून त्याअनुषंगाने अंतिम इशारा बैठक आज मांजरसुंबा येथे आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीसाठी बीड जिल्ह्याबरोबर नजीकच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मराठा समाज मांजरसुंबा येथे डेरेदाखल होत असून त्याठिकाणी मराठ्यांची मोठठ्या प्रमाणावर गर्दी पहावयास मिळत आहे.
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीकडून मांजरसुंब्यासाठी निघाले असून त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत पहावयास मिळत आहे. दुपारी एक वाजता ते बीड शहरात डेरेदाखल होते. ते आता पुढे मांजरसुंब्यासाठी जात आहेत. त्यांच्या काफिल्यात शेकडो गाड्या पहावयास मिळत आहेत. आजच्या अंतिम इशारा बैठकीचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता 29 तारखेला मुंबईत होणारे आंदोलन किती व्यापक असेल हे आजच्या बैठकीतून निदर्शनास येत आहे. दुपारी अडीचनंतर या बैठकीला सुरुवात होणार आहे. अंतिम इशारा बैठकीतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्य सरकारला काय इशारा देतात याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.





