
‘जनजाती’च्या ऐतिहासिक योगदानावर मंथन
परदेशी पाहुण्यांचे आदिवासी गीत, नृत्याने स्वागत; नवगण शिक्षण संस्थेकडून आयोजन
-आ.भीमराव केराम, विद्यापीठाचे कुलगुरू, जिल्हाधिकार्यांसह मान्यवरांची उपस्थिती
बीड (रिपोर्टर): भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त ‘जनजाती गौरव’ विशेष कार्यक्रमांतर्गत ‘भारतीय इतिहासाच्या जडणघडणीत जनजाती (आदिवासी) समाजाचे योगदान व भूमिका’ या विषयावर आधारित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी (दि.24) उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.विजय फुलारी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार भीमराव केराम, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, साऊथ आफ्रिका विद्यापीठाचे मानववंशशास्त्र व पुरातत्वशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. झोडवा रादेबे, कला व संगीत विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. बोंगानी मखोंझा, पद्मश्री चैत्राम पवार, डॉ.दिपाताई क्षीरसागर, डॉ.सारिकाताई क्षीरसागर, आदिवासी विकास मंत्र्यांचे ओएसडी धनराज पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, सेवानिवृत्त आयुक्त संभाजी सरकुंडे, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक मेश्राम, नवगण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किशोर काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या चर्चासत्राचे आयोजन नवगण शिक्षण संस्था संचलित पाटोदा येथील वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने केले असून भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद, नवी दिल्ली आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या संस्थांचे सहकार्य लाभले. दोन दिवस चालणार्या या चर्चासत्रात जनजाती समाजाचे भारतीय इतिहासातील योगदान, सांस्कृतिक परंपरा, सामाजिक व राजकीय भूमिका तसेच भविष्यातील दिशा या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. प्रास्ताविक प्रा.हमराज उईके यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार मयुरा सावी यांनी केले.
डॉ.योगेश क्षीरसागरांनी चर्चासत्राचा
उद्देश सांगून केले मान्यवरांचे स्वागत
नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले की, जगभरात 37 चर्चासत्र होत असून त्यापैकी 5 आंतरराष्ट्रीय पातळीवरील आहेत. त्यात बीड येथे एक चर्चासत्र होत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. यामुळे बीडचे नाव जगभरातील शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात पोहोचत आहे. या परिषदेचा मुख्य हेतू म्हणजे भारताच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय विकासामध्ये जनजाती समाजाचे योगदान अधोरेखित करणे, त्यांच्या परंपरा व शौर्याचा गौरव करणे व त्यांच्या वारशाचे पुनर्मूल्यांकन करणे हा आहे. ते पुढे म्हणाले की, या चर्चासत्राचे यजमानपद नवगण शिक्षण संस्थेकडे आले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यातील जनजाती समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आदिवासी विकास मंत्रालयाकडे आपण पाठपुरावा करू. दरम्यान, त्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागतही केले.





