बीड (रिपोर्टर) नागापूर फाटा ते नागपूर हा दोन कि.मी.चा रस्ता अत्यंत खराब आहे. पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावर नुसता चिखल होतो. रस्त्याचे दोनदा उद्घाटन होऊनही अद्यापही या रस्त्याचे काम झाले नसल्याने गावकर्यात संताप व्यक्त केला जात आहे. सदरील रस्ता तात्काळ करण्यात यावा अशी मागणी या भागातील नागरिकांतून केली जात आहे.
ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था आजही अत्यंत वाईट आहे. काही ठिकाणी रस्त्यावरून पायी चालणे मुश्कील झाले आहे. बीड तालुक्यातील नागापूर खुर्द फाटा ते नागापूर या दरम्यानचा दोन कि.मी.चा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. पावसामुळे रस्त्यावर नुसता चिखल झाला. रस्त्यावरून पायी चालणे अवघड होऊन बसले. या रस्त्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आणि शिवसेनेचे कुंडलिक खांडे यांनी उद्घाटन केलेले आहे. उद्घाटनाला काही महिन्यांचा कालावधी लोटला असून रस्त्याचे काम अद्यापही झाले नाही. उद्घाटन केवळ देखावा म्हणून केले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदरील रस्ता तात्काळ करण्यात यावा, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.