
मुंबई (रिपोर्टर): मराठा आरक्षणाविषयी सरकारने लागू केलेल्या शासन निर्णयाला (जीआर) विरोध करणार्या ओबीसी संघटना व नेत्यांनी हैदराबाद गॅझेटियरचा अभ्यास केल्यास त्यांच्या मनातील सर्व शंका दूर होतील, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तसेच, एका शासन निर्णयामुळे मराठा समाजाचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत, आम्ही सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने करू, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, राज्य सरकारने अवघ्या अर्ध्या तासात शासन निर्णय लागू केला असला तरी त्यावर आमचे तज्ज्ञ चार दिवस काम करत होते, विविध नियमांचा अभ्यास करत होते. या शासन निर्णयामुळे मराठा समाजाला जातप्रमाणपत्र मिळतील. ते करत असताना ओबीसी समाजाचं कुठलं आरक्षण कमी होणार नाही. कुठल्याही समाजाला मदत करत असताना, त्यांना सोयी-सुविधा देत असताना इतर समाजांचं किंबहुना ओबीसींचं नुकसान होऊ नये ही भूमिका आम्ही घेतली आहे. आमच्या सरकारची ही अगदी पहिल्यापासूनची भूमिका होती. आजही आमची तीच भूमिका आहे. एकनाथ शिंदे हे टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.







